
लव्ह मॅरेज करताय? तर थांबा ! आता आई-वडिलांना सांगावंच लागणार; अन्यथा...
अहमदाबाद : लग्न म्हटलं की आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. काही जण अॅरेंज मॅरेज अर्थात ठरवून पारंपारिक पद्धतीने तर काही जण लव्ह मॅरेज करतात. पण, लव्ह मॅरेज करताना अनेकदा संबंधित तरुण अथवा तरूणीच्या आई-वडिलांना कोणतीही माहिती मिळत नसे. मात्र, आता असे होणार नाही. गुजरात सरकारने विवाह नोंदणी नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार, लव्ह मॅरेज संदर्भात आई-वडिलांना याची माहिती द्यावीच लागणार आहे.
गुजरातचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांनी राज्य विधानसभेत गुजरात विवाह नोंदणी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला. आंतरधर्मीय विवाहांमध्ये बनावट विवाह आणि लपवलेली ओळख रोखण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे सरकारने म्हटले आहे. या प्रस्तावानुसार, वधू आणि वरांना आता विवाह नोंदणी करताना एक घोषणापत्र सादर करावे लागेल, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या पालकांना लग्नाबद्दल माहिती दिली आहे की नाही हे नमूद करावे लागेल. अर्जात दोन्ही पालकांचे नाव, पत्ता, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर आवश्यक असेल.
दरम्यान, अर्जाची तपासणी केल्यानंतर, सहाय्यक निबंधक १० कामकाजाच्या दिवसांत पालकांना व्हॉट्सअॅप, ई-मेल किंवा इतर माध्यमातून सूचना पाठवतील. सरकारचा असा विश्वास आहे की, यामुळे कुटुंबांना वेळेवर माहिती मिळेल.
प्रमाणपत्रे जारी करण्यास जास्त वेळ
नवीन प्रस्तावानुसार, विवाह प्रमाणपत्रे जारी करण्यास ३० ते ४० दिवस लागू शकतात. या काळात कोणत्याही आक्षेपांची चौकशी केली जाईल. सर्व कागदपत्रे ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी लागतील आणि यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले जाईल. फसवणूक रोखण्यासाठी साक्षीदारांचे फोटो आणि आधार कार्ड देखील अनिवार्य केले जातील.
मुलींच्या संरक्षणासाठी कायद्याची चोख अंमलबजावणी
हर्ष संघवी यांनी विधानसभेत सांगितले की, मुलींचे संरक्षण करण्यासाठी आणि सामाजिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. खोट्या बहाण्याने लग्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत, तरुणींना आमिष दाखवून इतर राज्यात नेण्यात आल्याची असंख्य प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे आता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जात आहे.
हेदेखील वाचा : Smriti-Palash;लग्नाच्या वादात नवीन ट्विस्ट! “माझे आणि पलाशचे…”, व्हायरल चॅट प्रकरणातील मुलीने समोर येऊन केला धक्कादायक खुलासा