PM Modi launched Vikasit Bharat Rozgar Yojana offering ₹15000 to youth in their first private job
15 August Modi Speech : स्वातंत्र्यदिनाच्या गौरवपूर्ण सोहळ्यात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांसाठी ऐतिहासिक घोषणा केली. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी “प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना” सुरू करण्याची घोषणा करताच संपूर्ण देशाचे लक्ष या योजनेकडे वळले आहे. या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून १५,००० रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मते, पुढील दोन वर्षांत ३.५ कोटींपेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या योजनेमुळे रोजगार निर्मितीला नवा वेग मिळणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजचा दिवस फक्त स्वातंत्र्याचा उत्सव नाही, तर भारतातील तरुणांसाठी नवा आशावाद घेऊन आला आहे. आम्ही १ लाख कोटी रुपयांची रोजगार योजना सुरू करत आहोत, जी उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मितीला चालना देईल.” सरकारचे मत आहे की, उत्पादन क्षेत्र हे देशाच्या आर्थिक विकासाचे हृदय आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांना प्रोत्साहन देऊन तरुणांना पहिली नोकरी मिळताच थेट आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Independence Day Modi Speech : भारताची ताकद आकाशात झेपावेल! लाल किल्ल्यावरून PM मोदींचे तरुणांना स्फूर्तीदायी आवाहन
या योजनेअंतर्गत प्रोत्साहन मिळवण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत
तरुणांनी कंपनीत पहिल्यांदा नोकरी मिळवलेली असावी.
संबंधित कंपनीची EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) मध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे.
तरुणांनी त्या कंपनीत किमान ६ महिने अखंड सेवा केलेली असावी.
अटी पूर्ण झाल्यावर, सरकारकडून १५,००० रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील.
या योजनेची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तरुणांना नोकरी मिळताच आणि पीएफ खाते सुरू होताच ते आपोआप योजनेसाठी पात्र ठरतील. पहिला हप्ता नोकरी सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी थेट बँक खात्यात जमा होईल.
हे देखील वाचा : Independence Day 2025: UP चे 33 ग्रामप्रमुख बनले स्वातंत्र्यदिनाचे ‘हिरो’; लाल किल्ल्यावर होणार सन्मान
विशेषज्ञांच्या मते, ही योजना केवळ तरुणांना आर्थिक बळ देणार नाही, तर खासगी कंपन्यांनाही नवीन भरती करण्यासाठी प्रोत्साहित करेल. उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक आणि रोजगार संधी यामुळे देशाच्या GDP वाढीला देखील चालना मिळण्याची शक्यता आहे. या योजनेद्वारे भारताच्या तरुण पिढीला केवळ नोकरीच नव्हे, तर करिअरची मजबूत सुरुवात आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला होणार आहे.