अधिवेशनाआधी PM मोदींनी संसद भवनात बोलावली तातडीची बैठक; अमित शहा, जेपी नड्डांसह राजनाथ सिंह यांचीही उपस्थिती
संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. या दरम्यान संसद भवनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल हेही उपस्थित आहेत.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पावसाळी अधिवेशनाला “विजयोत्सव” असं म्हटलं आहे. संपूर्ण जगानं भारताची सैन्यशक्ती पाहिली असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘तोंड उघडायला लावू नका, तुमच्याबद्दल महाराष्ट्रात वाईट अनुभव …’; CJI गवईंनी ईडीला घेतलं फैलावर
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांनी संसद भवनात देशाच्या अनेक विषयांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “बॉम्ब आणि बंदुकीवर संविधानाचा विजय होत आहे. देशात नक्षलवाद वेगानं कमी होत आहे. रेड झोन आता हळूहळू ग्रीन झोनमध्ये बदलत आहेत. हे अधिवेशन देशासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे असून गे विजयोत्सवासारखं आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आमच्या सुरक्षादलांनी 100 टक्के लक्ष्य गाठलं आहे. संपूर्ण जगानं आमच्या सुरक्षादलांची क्षमता पाहिली आहे.”
पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर विविध देशांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बहुपक्षीय प्रतिनिधीमंडळांचं कौतुक केलं. ते म्हणाले, “या प्रतिनिधीमंडळांनी दहशतवादाचे प्रमुख आश्रयदाता असलेल्या पाकिस्तानचं खोटं तोंडावर पाडलं आहे. मी सर्व खासदार आणि पक्षांनी देशहितासाठी केलेल्या या कार्याचं अभिनंदन करतो. सर्व पक्षांचे राजकीय अजेंडे वेगळे असू शकतात, पक्षहितासाठी मते वेगळी असू शकतात, पण देशहितासाठी मनं एकत्र यायला हवीत.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आमच्या सुरक्षादलांनी फक्त २२ मिनिटांत दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांच्या तळांना जमिनदोस्त केलं. मला विश्वास आहे की या पावसाळी अधिवेशनात सर्व खासदार एकता आणि विजयाच्या भावनेने देशाची सैन्यशक्ती, जनतेची प्रेरणा आणि मेड इन इंडिया संरक्षण क्षमतेला बळकट करणारा विचार जोरकसपणे मांडतील.”
अखेर ‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेत चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार; विरोधी पक्षांच्या मागणीला यश
पंतप्रधान मोदी यांनी नक्षलवादाविरोधातील सरकारच्या ठोस कारवाईचा उल्लेख करत सांगितलं, “देशात अनेक वर्षं नक्षलवाद होताच. पण आज नक्षलवाद सिमित होत चाललाय. जे भाग पूर्वी रेड कॉरिडोर म्हणून ओळखले जायचे, ते आता विकासाचे केंद्र बनत आहेत. सुरक्षादल नक्षलवादाच्या समूळ नष्टीसाठी जोशात काम करत आहेत. अभिमानानं सांगू शकतो की, देशातील अनेक जिल्हे आता नक्षलवादमुक्त झाल्याचं ते म्हणाले.