PM Modi to visit Bihar's Jamui, unveil projects worth Rs 6,640 cr on Birsa Munda's birth anniversary
जमुई : देशभरामध्ये बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. बिरसा मुंडा यांची यंदा 150 वी जयंती आहे. बिरसा मुंडा यांच्या कार्यामुळे आदिवासी गौरव दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आदिवासी गौरव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठे उद्घाटन केले जाणार आहे. आज पंतप्रधान बिहारमधील जमुई येथे जाणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी 6,640 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत.
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांनी जमुई येथे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदिवासी समुदायांचा समृद्ध इतिहास आणि वारसा जतन करण्यासाठी दोन आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय आणि दोन आदिवासी संशोधन संस्थांचे उद्घाटन करतील. तसेच, ते आदिवासी समुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी पीएम-जनमन अंतर्गत बांधण्यात आलेल्या 11,000 घरांच्या गृहप्रवेश कार्यक्रमातही सहभागी होतील.
10 एकलव्य मॉडेल स्कूलची पायाभरणी करणार
पंतप्रधानांच्या हस्ते अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्टचे उद्घाटन होणार आहे. त्यातील एक म्हणजे एकलव्य मॉडेल निवासी शाळा. या प्रकल्पांमध्ये 10 एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि 300 वन धन विकास केंद्रांचा समावेश आहे. यामुळे आदिवासी तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. याशिवाय 23 मोबाईल मेडिकल युनिट्स आणि अतिरिक्त 30 युनिट्सच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी भागात आरोग्य सेवा सुलभ करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. आदिवासी भागात सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या संपूर्ण सरकारी दृष्टिकोनावर आधारित ही सर्व विकासकामं सुरु आदिवासी समाजासाठी हा पंतप्रधानांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हे देखील वाचा : दिल्लीत पुन्हा आपची सत्ता; विधानसभा निवडणुकीआधी केजरीवाल यांच्या पक्षाला दिलासा
विस्तृत सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहार दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. बल्लोपूर मैदानावरील कार्यक्रमाच्या ठिकाणी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) च्या देखरेखीखाली सुरक्षा ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी कायदा व सुव्यवस्था व सुरक्षेवर जिल्हा प्रशासन व पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून आहेत. यासोबतच कार्यक्रमस्थळी तीन हेलिपॅड, जर्मन हँगर टेंट आणि सुमारे 25 हजार लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमधील या पंतप्रधानांचा दौरा महत्त्वपूर्ण असून आदिवासी लोकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी विकामकामं सुरु होणार आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी मोदी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. त्यासाठी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा शुभमुहूर्त साधला आहे.