
Rahul Gandi hydrogen bomb: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हरियाणा विधानसभा निवडणुका आणि कथित मतदार गैरव्यवहारांबाबत गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत सुरुवातीला त्यांनी गुरु नानक देवजींचे स्मरण करून त्यांना लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान म्हटले. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेकडे लक्ष वेधले आहे. राहुल गांधी म्हणाले, “हरियाणा निवडणुकीसंबंधी अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. पक्षाने या तक्रारींची सखोल चौकशी केली असून चौकशीत लक्षणीय गैरव्यवहार उघडकीस आले आहेत.”
पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी झालेल्या हरियाणा निवडणुकीतील मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आणला आहे. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत एका तरुणीचा फोटो दाखवण्यात आला. या फोटोसोबत २२ ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचे आरोप करण्यात आले. राहुल गांधी म्हणाले की, या तरुणीने कधी सीमा नावाने तर कधी सरस्वती नावाने २२ मते टाकली.
राहुल गांधींनी विचारले की, हरियाणाच्या मतदार यादीत ही ब्राझिलियन महिला काय करत आहे. हरियाणातील पाच श्रेणींमध्ये २५ लाख मते चोरीला गेली. राहुल गांधी यांनी आकडेवारी देत सांगितले की, ५ लाख २१ हजारांहून अधिक डुप्लिकेट मतदार सापडले आहेत. हरियाणात एकूण २ कोटी मतदार आहेत. २५ लाख मते चोरीला गेली म्हणजे दर आठ मतदारांपैकी एक बनावट होता. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत हरियाणा विधानसभा निवडणुकांदरम्यान झालेल्या कथित मतदार गैरव्यवहारांबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, एका बूथवर त्याच महिलेचे नाव २२३ वेळा आल्याचे आढळले असून, निवडणूक आयोगाने त्या महिलेने प्रत्यक्षात किती वेळा मतदान केले, याचे स्पष्टीकरण द्यावे.
राहुल गांधी म्हणाले, “सीसीटीव्ही फुटेजमधून सर्व काही स्पष्ट झाले असते, पण ते जाणीवपूर्वक डिलीट करण्यात आले. एका मुलीने १० ठिकाणी मतदान केले, तर बनावट फोटो असलेले तब्बल १,२४,१७७ मतदार आढळले. एका महिलेने नऊ ठिकाणी मतदान केल्याची नोंद आहे. या सर्व घटनांमागे भाजपला मदत करण्याचा हेतू असल्याचा आरोप केला. तसेच, “या मतचोरीची चौकशी आता लोकांनीच करावी,” असे आवाहन केले.
राहुल गांधी म्हणाले की, दलचंद हे उत्तर प्रदेश आणि हरियाणातील मतदार आहेत. त्यांचा मुलगाही हरियाणातील मतदार आहे आणि उत्तर प्रदेशात भाजपला मतदान करतो. भाजपशी संबंध असलेले हजारो लोक आहेत. मथुराचे सरपंच प्रल्हाद यांचे नाव हरियाणातील अनेक ठिकाणी मतदार यादीत आहे.
‘आम्ही पुणे महानगरपालिकेची भरणार नाही थकबाकी’; फुरसुंगीकरांचा नकार, थकबाकी वगळून बिले न आल्यास
राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांच्याकडे घरे नाहीत त्यांच्या घरांचे क्रमांक शून्य नोंदवले जातात, असा दावा ज्ञानेश कुमार यांनी केला होता. यावेळी राहुल यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला, ज्यामध्ये बेघर लोकांच्या मतदार यादीत असलेल्या पत्त्यांबद्दल माहिती दिली जात होती. राहुल गांधी म्हणाले की, आम्ही उलटतपासणी केली. मतदार यादीत ज्यांच्या घराचा पत्ता शुन्य नोंदवण्यात आला होता. त्याठिकाणी जाऊन चौकशी केली असता तिथे मोठा बंगलाच आढळून आला.