बिहारच्या राजकारणात नवं समीकरण; प्रशांत किशोर, आरसीपी सिंह NDA, INDIA आघाचीचं टेन्शन वाढवणार
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. नव्या राजकीय समीकरणांचा उदय होत आहेत. माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी त्यांच्या ‘आप सबकी आवाज़’ पक्ष प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीत विलिन केला आहे. यामुळे आगामी विधानसभा विडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आणि इंडिया आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये सध्या भाजपा-जद(यू) नेतृत्वाखालील एनडीए आणि राजद-काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महागठबंधन यांच्यात थेट लढत होणार होती. मात्र आता, प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखालील जन सुराज पार्टीही तिसऱ्या पर्यायाच्या रूपात संपूर्ण ताकदीने मैदानात उतरत आहे. जन सुराजने 243 पैकी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्धार केला आहे. प्रशांत किशोर यांनी राज्यभर जिल्हानिहाय दौरे केले आहेत आणि विविध समाजघटकांपर्यंत पोहोचत. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही राज्याच्या विकासाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.
आरसीपी सिंह यांचा बिहारच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. मूळचे कुर्मी समाजातील आणि एकेकाळचे IAS अधिकारी असलेले सिंह हे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. त्यांनी नीतीश कुमार यांच्या रेल्वेमंत्री काळात प्रशासकीय सेवा दिली होती. नंतर ते 2010 मध्ये सिव्हिल सेवा सोडून जद(यू) मध्ये सामील झाले. त्यांनी दोनदा राज्यसभेत जाऊन केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले. मात्र, 2021 नंतर नीतीश कुमार यांच्याशी मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी नवीन पक्ष ‘आप सबकी आवाज़’ स्थापन केला होता. मात्र आता हा पक्ष जन सुराजमध्ये विलिन करून प्रशांत किशोर यांच्यासोबत नवीन राजकीय प्रयोगाची सुरुवात केली आहे.
राजकीय रणनीतीकार म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेल्या किशोर यांनी बिहारमध्ये राजकारणात प्रत्यक्ष प्रवेश केला असून, राज्यातील भ्रष्टाचार, विकासाचा अभाव, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात लालू यादव आणि नीतीश कुमार यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की, “जर या नेत्यांनी खरोखरच विकासावर लक्ष केंद्रित केलं असतं, तर बिहारची आज अशी दुर्दशा नसती.”
जन सुराज, AIMIM आणि इतर लहान पक्षांची एकजूट ही निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीची शक्यता दर्शवते. आरसीपी सिंह यांच्या अनुभवाचा फायदा किशोर यांना होण्याची शक्यता आहे, विशेषतः कुर्मी आणि ओबीसी मतदारांमध्ये. मात्र, बिहारसारख्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या राज्यात नव्या पक्षांचा प्रभाव किती असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
केंद्र सरकार पाकिस्तानला घेरणार; पहलगाम हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
राज्यात नव्या नेतृत्वाची गरज असल्याचं चित्र प्रशांत किशोर रंगवत आहेत. मात्र, मतदार हे पारंपरिक पक्षांपासून दूर जातील की नाही, हे अजूनही अनिश्चित आहे. आरसीपी सिंह यांची साथ आणि जन सुराजचा व्यापक जनसंपर्क हा एक शक्तिशाली प्रयोग ठरू शकतो. मात्र, अंतिम निकाल काय येतो, हे तर निवडणुकीनंतरच कळेल. सध्या तरी बिहारच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ही नवी जोडी ठरली आहे.