
Pollution Control Ship, Maritime Security, Marine Pollution Control,
Samudra Pratap Ship: भारताच्या सागरी सीमांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दिशेने एक नवीन अध्याय जोडला गेला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी देशातील पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ हे दक्षिण गोव्यातील वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) येथे भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) सेवेत औपचारिकपणे दाखल केले.
संबंधित अधिकाऱ्यांकडून हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेडने बनवले आहे. ११४.५ मीटर लांबीच्या या जहाजात ६० टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटक आहेत. या जहाजाचे वजन ४,२०० टन आहे आणि त्याचा वेग २२ नॉट्सपेक्षा जास्त आहे. हे जहाज सागरी प्रदूषण नियंत्रण नियमांची अंमलबजावणी, सागरी कायदा अंमलबजावणी, शोध आणि बचाव कार्य आणि भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राचे (EEZ) संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. डिसेंबरमध्ये हे जहाज औपचारिकपणे GSL येथे तटरक्षक दलाकडे सोपवण्यात आले.
तब्बल 50000 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात; शिक्षकांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला कोर्टात आव्हान
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी दक्षिण गोव्यातील वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) येथे एका नव्या जहाजाचे औपचारिक लोकार्पण केले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग तसेच भारतीय तटरक्षक दलाचे (ICG) महासंचालक परमेश शिवमणी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “सागरी संसाधने ही कोणत्याही एका देशाची मालमत्ता नसून ती संपूर्ण मानवतेचा सामायिक वारसा आहेत. वारसा जेव्हा सामायिक केला जातो, तेव्हा त्यासोबतची जबाबदारीही सामायिक असते. याच भूमिकेतून भारत आज एक जबाबदार सागरी शक्ती म्हणून पुढे आला आहे.”
सिंग यांनी भारताच्या सागरी सुरक्षेबाबतची भूमिका अधोरेखित करताना जागतिक पातळीवर शांतता, सुरक्षितता आणि सहकार्याला भारत प्राधान्य देत असल्याचे सांगितले. तसेच संरक्षण क्षेत्रात महिलांचा पुरेसा आणि अर्थपूर्ण सहभाग सुनिश्चित करणे हे केंद्र सरकारचे महत्त्वाचे ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. या जहाजाच्या समावेशामुळे भारतीय सागरी क्षमता अधिक मजबूत होणार असून, देशाच्या सागरी सुरक्षेला नवे बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
समुद्र प्रताप हे जहाज आपल्या रचना, ताकद आणि तंत्रज्ञानामुळे जागतिक स्तरावर वेगळे ठरते. या जहाजाची पाच प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत—
१) लांबी आणि वजन
समुद्र प्रताप हे सुमारे ११५ मीटर लांब असून त्याचे वजन अंदाजे ४,२०० टन आहे. मोठी रचना आणि भक्कम बांधणीमुळे हे जहाज कठीण सागरी परिस्थितीतही प्रभावीपणे कार्य करू शकते.
२) उच्च वेग क्षमता
हे जहाज २२ नॉट्सपेक्षा अधिक वेगाने समुद्रातील लाटांवर मात करू शकते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणे शक्य होते.
३) बहुमुखी कार्यक्षमता
समुद्र प्रताप एकाच वेळी प्रदूषण नियंत्रण, बचावकार्य तसेच सागरी गस्त घालण्यास सक्षम आहे. त्यामुळे हे जहाज अनेक भूमिका पार पाडू शकते.
४) स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर
या जहाजातील सुमारे ६० टक्के घटक स्वदेशी असून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला बळ देणारे आहेत.
५) अत्याधुनिक देखरेख क्षमता
धुके, खराब हवामान किंवा कमी दृश्यमानतेतही शत्रूचा माग काढण्याची आणि चोरी रोखण्याची क्षमता या जहाजात आहे.
या वैशिष्ट्यांमुळे समुद्र प्रताप हे केवळ शक्तिशालीच नव्हे, तर आधुनिक, बहुउद्देशीय आणि भविष्यातील सागरी सुरक्षेसाठी महत्त्वाचे जहाज ठरते.
समुद्रातील तेल गळती ही जागतिक पातळीवरील गंभीर समस्या असून त्यामुळे सागरी जीवसृष्टी आणि पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. या आव्हानाला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी ‘समुद्र प्रताप’ या जहाजात अत्याधुनिक प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.तेल गळती रोखण्यासाठी आणि संकलित करण्यासाठी या जहाजावर आधुनिक स्किमर्स आणि बूम्स बसवण्यात आले आहेत. याच्या मदतीने समुद्रात पसरलेले तेल त्वरीत अडवता येते आणि गोळा करता येते. तसेच या जहाजात एक प्रगत प्रयोगशाळा उभारण्यात आली असून, ती रिअल टाइममध्ये सागरी प्रदूषणाचे विश्लेषण करण्यास सक्षम आहे.
समुद्र प्रतापमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित तेल साठवण्यासाठी विशेष साठवण टाक्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाची संपूर्ण प्रक्रिया एकाच ठिकाणी प्रभावीपणे राबवता येते. या सर्व सुविधांमुळे हे जहाज प्रत्यक्षात एक ‘फिरते महासागर स्वच्छता संयंत्र’ ठरते. याशिवाय या जहाजावर हेलिपॅडची सुविधा उपलब्ध असून, हवाई देखरेखीच्या माध्यमातून प्रदूषणाचे स्रोत जलदगतीने शोधणे शक्य होते. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे भारत सागरी प्रदूषण नियंत्रण आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात आघाडीच्या देशांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम करत आहे.