मिरा रोड : मिरा रोडच्या अमानुष हत्याकांडात बळी गेलेली सरस्वती वैद्य यांच्या ३ बहिणी असल्याचं समोर आलेलं आहे. सरस्वती वैद्य या अनाथ असल्याचा दावा सुरुवातीला नराधम आरोपी मनोज साने यानं केला होता. मात्र आता सरस्वती वैद्य यांच्या तीन बहिणी असल्याचं समोर आलेलं आहे. या तिन्ही बहिणींकडून मनोज साने आणि सरस्वती यांचं लग्न झाल्याचा दावाही करण्य़ात येतोय. मीरा रोडमध्ये एका मंदिरात या दोघांचं लग्न झालं होतं, असं या बहिणींचं म्हणणं आहे. आता सरस्वतीच्या हत्याकांडानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे मिळावेत अशी मागणी या बहिणींना पोलिसांकडे केली आहे. तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची या बहिणींची इच्छा आहे.
सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाच्या तुकड्यांची डीएनए चाचणी
पोलीस बहिणींचे डीएनए आणि मृतदेहाच्या डीएनएची तपासणी करणार असल्याचंही सांगण्यात येतंय. यासाठीची वैद्यकीय प्रक्रिया सुरु झाल्याचंही सांगण्यात येतंय. साने य़ानं सरस्वती अनाथ असल्याचा दावा केला होता, तसचं आपणही अनाथ असल्याचं खोटं त्यानं पोलिसांना सांगितलं होतं. मात्र बोरिवलीच्या बाभई भागात त्याचा फ्लॅट असल्याचं आणि त्याच इमारतीत त्याच्या नातेवाईकांचे फ्लॅट्स असल्याचं समोर आलेलं आहे. सरस्वतीला चार बहिणी आहेत, त्यात सरस्वती शेवटची होती, असंही समोर आलंय. तिच्या आई वडिलांच्या घटस्फोटानंतर या बहिणींना नगरच्या बालिका अनाथाश्रमात ठेवण्यात आलं होतं. पोलिसांची एक टीम त्या ठिकाणीही पोहचलेली आहे.
मनोज आणि सरस्वतीचं लग्न झालं होतं
सरस्वतीच्या तिन्ही बहिणी मीरा रोडच्या परिसरातच राहत असल्याची माहिती आहे. सरस्वती सुरुवातीला काही काळ त्यांच्याकडे राहत होती. मनोजशी मंदिरात लग्न केल्याचं सरस्वतीनं या बहिणींना सांगितलं होतं. साने याच्या घरात मात्र याची कल्पना नव्हती. सानेचं वय ५६ तर सरस्वती यांचं वय ३६ होतं. या वयाच्या अंतरामुळंही हे लग्न लपवलं जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.