Axiom-4 अंतराळ मोहीम स्थगित; शुभांशु शुक्ला आता या तारखेला झेपावणार अवकाशात
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) ऐतिहासिक सहभागामुळे चर्चेत असलेल्या Axiom-4 अंतराळ मोहिमेचे उड्डाण हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आलं आहे. इस्रोने त्यांच्या अधिकृत X हँडलवरून ही माहिती दिली आहे. “हवामानाच्या स्थितीमुळे Axiom-4 मोहिमेचे प्रक्षेपण १० जूनऐवजी ११ जून रोजी होणार आहे. प्रक्षेपणाचा नवा वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता असेल, अशी माहिती ISRO चे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांनी दिली.
या मोहिमेत भारतीय वायुदलाचे वैमानिक ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा सहभाग असून, ते तीन अन्य अंतराळवीरांसोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) १४ दिवसांच्या मिशनसाठी जाणार आहेत. Axiom-4 ही भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे, कारण यामध्ये पहिल्यांदाच भारताचा गगनयात्री खासगी मोहिमेद्वारे ISS वर जाणार आहे.
ही मोहीम अमेरिकेच्या नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथील LC-39A या प्रक्षेपण स्थळावरून SpaceX च्या ड्रॅगन यानाद्वारे पार पडणार आहे. यामध्ये भारत, पोलंड आणि हंगरीचे अंतराळवीर सहभागी आहेत, आणि प्रत्येक देशासाठी ही त्यांची पहिलीच ISS मोहिम आहे.
Axiom-4 मोहिमेअंतर्गत एकूण ६० वैज्ञानिक प्रयोग केले जाणार असून, यापैकी सात प्रयोगांची आखणी ISRO ने केली आहे. शुभांशु शुक्ला हे NASA च्या Human Research Program अंतर्गत पाच प्रयोगांमध्ये भाग घेणार असून, त्याशिवाय आणखी पाच सहकार्यात्मक अभ्यासप्रकल्पांमध्येही सहभागी होणार आहेत.
या मोहिमेच्या नेतृत्वाची धुरा अनुभवी अमेरिकन अंतराळवीर पेगी व्हिट्सन यांच्याकडे असून, त्या याआधी तीन वेळा अंतराळात जाऊन आल्या आहेत. पोलंडचे स्लावोज उज़्नान्स्की-विस्निएव्स्की आणि हंगरीचे टिबोर कापू हे दोघेही वैज्ञानिक आणि अभियंता असून, मिशन स्पेशालिस्ट म्हणून कार्य करतील.
गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चार भारतीय अंतराळवीरांपैकी एक असलेल्या शुभांशु शुक्ला यांच्यासाठी ही मोहीम एक महत्त्वपूर्ण पायरी मानली जात आहे. गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळमोहीम असून, ती लवकरच पूर्णत्वास जाईल.
Axiom-4 च्या माध्यमातून भारताचा अंतराळ क्षेत्रातील वाढता सहभाग आणि जागतिक पातळीवरची उपस्थिती अधिक दृढ होणार आहे. आता सर्वांचे लक्ष ११ जूनच्या या ऐतिहासिक प्रक्षेपणाकडे लागले आहे.