नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला पुढील आठवड्यापर्यंत भारतात उपग्रहाद्वारे ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळू शकते. ईटी टेलिकॉमच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. स्टारलिंकने आपल्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबाबत डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (डीपीआयआयटी) ला स्पष्टीकरण पाठवल्यानंतर ही माहिती मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टारलिंकने डीपीआयआयटीला प्रतिसाद दिला आहे आणि दूरसंचार विभाग येत्या काही दिवसांत किंवा या महिन्याच्या अखेरीस कंपनीला लेटर ऑफ इंटेंट जारी करू शकते. दूरसंचार विभाग बुधवारी स्टारलिंकला इरादा पत्र जारी करू शकते. मंजुरीनंतर, सॅटेलाइट कम्युनिकेशन्स विंग देखील स्टारलिंकला मान्यता देईल.
अहवालात म्हटले आहे की, विभाग पुढील आठवड्यापर्यंत दूरसंचार सचिव नीरज मित्तल आणि कम्युनिकेशन सचिव अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीसाठी पत्र तयार करत आहेत. अहवालात म्हटले आहे की, मंजुरीनंतर लवकरच सॅटेलाइट कम्युनिकेशन्स विंग इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील कंपनी स्टारलिंकला देखील मान्यता देईल. नीरज मित्तल आणि अश्विनी वैष्णव हे दोघेही सध्या देशाबाहेर आहेत.
…तर तिसरी कंपनी बनेल
मस्क यांच्या स्टारलिंकने नोव्हेंबर 2022 मध्ये भारतात सॅटेलाइट सर्व्हिसेसद्वारे ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशनसाठी अर्ज केला होता. मान्यता मिळाल्यानंतर, रिलायन्स जिओ आणि सुनील मित्तल यांच्या वन वेबनंतर हा परवाना मिळवणारी स्टारलिंक ही भारतातील तिसरी कंपनी बनू शकते. जीएमपीसीएस परवाना मिळाल्यानंतर, स्टारलिंक भारतातील व्यक्ती आणि संस्थांना संदेश सेवा, व्हॉइस सेवा आणि ब्रॉडबैंड प्रदान करण्यास सक्षम असेल.