तहव्वुर राणाने हल्ल्यात बजावली होती 'ही' महत्त्वाची भूमिका; त्याच्यामुळेच घडला घातपात
नवी दिल्ली : मुंबई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर हुसेन राणाचे भारतात प्रत्यार्पण झाले आहे. भारतात येताच NIA च्या पथकाने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतले आहे. त्याला एका विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले गेले. त्यानंतर त्याला NIA च्या न्यायालयात हजर करण्यात आले. तब्बल 19 वर्षांनंतर मुबंई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टमाईंड भारतात परतला आहे.
अनेक भाषा येणारा हेडली 14 सप्टेंबर 2006 रोजी पहिल्यांदा रेकी करण्यासाठी मुंबईत आला होता. 2006 मध्ये त्याने भारतात प्रवेश करण्यासाठी त्याचे नाव दाऊद गिलानीवरून बदलून डेव्हिड हेडली असे ठेवले. राणाने हेडलीला शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासातून पाच वर्षांचा मल्टिपल एन्ट्री व्हिसा मिळवून देण्यासही मदत केली. एनआयएच्या म्हणण्यानुसार, राणाने प्रथम हेडलीला त्याच्या इमिग्रेशन सेवा फर्म ‘फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस’ ची मुंबईत शाखा उघडण्यास मदत केली.
हेडलीने ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल आणि नरिमन हाऊससह शहरातील विविध ठिकाणांची रेकी करण्यासाठी याचा वापर केला. त्यानंतर त्याने मुंबईत जवळपास आठवेळा फेऱ्या केल्या आणि ‘लष्कर-ए-तोयबा’च्या 10 दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणांचे फोटो काढले, नकाशे आणि रेखाचित्रे तयार केली.
आयएसआयलाही माहिती पुरवली
प्रत्येक भेटीदरम्यान हेडली राणाच्या संपर्कात होता आणि फोनवरून त्याला प्रत्येक घडोमोडीची माहिती देत होता. एनआयएने हेडलीने राणाला पाठवलेले ई-मेल देखील सादर केले आहेत. ज्यामध्ये तो सूचना मागत असल्याचे दिसून आले आहे. मुंबईच्या प्रत्येक भेटीनंतर, हेडली पाकिस्तानला त्याच्या ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी आणि त्याने गोळा केलेली कागदपत्रे त्यांना देण्यासाठी गेला.
हेडलीची दुसरी पत्नी मुंबईत
2007 मध्ये हेडली मुंबईत दुसरी पत्नी फैजा आउटलहा हिच्यासोबत आला. तो ताज आणि ओबेरॉय, ट्रायडंट या हॉटेलमध्ये राहिला. तिथे त्याने हॉटेल्सचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. एनआयएच्या मते, हेडलीने विशेषतः ताजच्या दुसऱ्या मजल्याची रेकी केली. मार्च 2008 मध्ये, राणाने हेडलीला मुंबई बंदरात आणि आसपास बोटीतून प्रवास करण्याचे आणि दहशतवाद्यांसाठी सुरक्षित उतरण्याची जागा निश्चित करण्याचे काम सोपवले होते. या भेटीदरम्यानही हेडली फैजा आउटलहाला घेऊन भारतात आला होता.