'माझं आयुष्य उध्वस्त करण्याची काय गरज होती? संपूर्ण कुटुंब नाटक करतंय...' तेज प्रताप यांच्या पत्नी ऐश्वर्या राय यांचा गंभीर आरोप
लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यांच्या पोस्टने बिहारज्या राजकारणात वादंग उठलं आहे. या पोस्टनंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान तेज प्रताप यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी पती आणि यादव कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला मीडियाकडून सर्व काही समजलं आहे. घटस्फोटाची माहिती प्रथम मीडियाकडूनच मिळाली. हे सर्व लोक एकत्र आहेत. निवडणुकीमुळे हे घडलं आहे. संपूर्ण कुटुंब नाटक करत आहे. त्यांना विचारा की माझं आयुष्य उध्वस्त करण्याची काय गरज होती, असे आरोप त्यांनी केले आहेत.
ऐश्वर्या राय म्हणाल्या की, ‘हे सर्व लोक एकत्र आहेत. ते काल रात्रीही भेटले असतील. त्यांनी सांगितले असेल की सर्व काही शांत होईल. निवडणुकीमुळे हे सर्व घडत आहे. आम्हाला मीडियाकडून सर्व माहिती मिळते. आम्हाला काहीही माहित नाही, नाहीतर आम्ही आधीच भेटलो असतो. त्यांना विचारा की जेव्हा आम्हाला मारहाण करण्यात आली तेव्हा त्यांचा सामाजिक न्याय कुठे गेला. त्यांना हे ही विचारा की माझं काय होईल?’
कायदेशीर कारवाईच्या प्रश्नावर ऐश्वर्या म्हणाली, ‘आम्ही नंतर याबद्दल बोलू. तुम्ही सात वर्षांपासून पाहत आहात. आम्ही सर्व काही करत आहोत. त्यांनी सांगितले की त्याला १२ वर्षे झाली आहेत. लालू जी, राबडी जी, तेजस्वी, सर्वांना आधीच याविषयी माहिती असलं पाहिजे. माझा न्याय कुठे गेला. आम्ही आधीच लढत आहोत. भविष्यातही लढू, असं त्यांनी म्हटलं आहे.
तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या प्रेयसीचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून आणि कुटुंबातूनही हकालपट्टी केली.. लालू यादव यांनी असंही म्हटलं आहे की, ज्याला त्यांच्याशी संबंध ठेवायचे आहेत त्यांनी स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा.
Breaking News: लालू प्रसाद यादवांचा मोठा निर्णय; तेज प्रताप यादव पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित
दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या या निर्णयाला त्यांचा धाकटा मुलगा आणि तेज प्रताप यांचा भाऊ तेजस्वी यादव यांनीही पाठिंबा दिला आहे. तेजस्वी यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘माझ्या मते, मला हे सर्व आवडत नाही आणि सहनही होत नाही. मी माझं काम करत आहे. माझ्या मोठ्या भावाबद्दल सांगायचे तर, तो प्रौढ आहे आणि त्याला त्याचे वैयक्तिक निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.