पायलट होण्याचं स्वप्न, घुडसावी अन्...; RJD तून हकालपट्टी केलेल्या तेज प्रताप यांना बिहारच्या राजकारणात किती महत्त्व?
बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 24 मे रोजी त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावर एका महिलेबरोबरचा फोटो शेअर केला आहे. दावा केला की ते त्या महिलेसोबत मागील 12 वर्षांपासून ‘एका नात्यात’ राहत आहेत. या पोस्टमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
त्यांची ही पोस्टने वाऱ्यासारखी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर12 मिनिटांत ती पोस्ट डिलिट करण्यात आली. मात्र, तोपर्यंत स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. त्यानंतर तेज प्रताप यांनी X वरून स्पष्टीकरण देत आपल्या फेसबुक अकाऊंटवर हॅकिंग झाल्याचं म्हटलं आहे.या गोंधळात राष्ट्रीय जनता दलाने आणि त्यांच्या कुटुंबानेही तेज प्रताप यांच्याशी नाते तोडण्याची घोषणा केली आहे. पक्षातूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तेज प्रताप यांची वादात सापडण्याची ही पहिलेच वेळ नाही तर याआधीही त्यांच्या वागणुकीमुळे ते अनेकदा चर्चेत राहिले आहेत.
शिक्षण आणि करिअर
तेज प्रताप यादव हे लालू प्रसाद यादव व राबडी देवी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांच्या शिक्षणाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. myneta.info वर उपलब्ध माहितीनुसार, त्यांनी 2010 साली बिहार बोर्डमार्फत इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, कोणत्या शाखेत होते आणि किती गुण मिळाले हे स्पष्ट नाही. पुढे त्यांनी बिहार नॅशनल कॉलेज, पाटणा येथे राज्यशास्त्र विषयात पदवी शिक्षण सुरू केले, परंतु प्रथम वर्षही पूर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी शिक्षण थांबवले.
पायलट होण्याचं स्वप्न अधुरं
शिक्षण थांबल्यानंतर तेज प्रताप यांनी पायलट बनण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बिहार फ्लाइंग इन्स्टिट्यूटमध्ये कमर्शियल पायलट ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतला होता. त्यासाठी किमान 200 तासांची उड्डाण प्रशिक्षण आवश्यक होते, पण ते पूर्ण करता आले नाही. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान सोशल मीडियावर एक सर्टिफिकेट शेअर करत देशसेवा करण्याची इच्छा दर्शवली होती, परंतु तो सर्टिफिकेट रेडिओ टेलिफोन ऑपरेटरचा होता, पायलटचा नव्हे.
धार्मिक ओढ
तेज प्रताप यांना धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टींची गोडी आहे. ते स्वतःला भगवान श्रीकृष्णाचा भक्त मानतात आणि अनेकदा कृष्णवेषात फोटो शेअर करतात. त्यांना बासरी वाजवणे, योग साधना आणि घोडेस्वारीचीही आवड आहे. या सगळ्यांमुळे त्यांची एक वेगळी छाप पडते.
नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री
2015 मध्ये त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक जिंकली आणि नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये पर्यावरण, वन व हवामान बदल विभागाचे मंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या कमी शैक्षणिक पात्रतेवर टीका झाली, पण त्यांनी आपल्या कार्याने काही प्रमाणात विश्वास संपादन केला. वडील लालू यादव यांची राजकीय वारसा पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, 2025 मध्ये आलेल्या या फेसबुक पोस्ट प्रकरणामुळे पक्ष आणि कुटुंबाने त्यांच्याशी नाते तोडले आहे. आता तेज प्रताप यांचा पुढचा राजकीय प्रवास अनिश्चिततेच्या छायेत गेला आहे.