asaduddin owaisi (फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)
पहलगाम दहशतवादी हल्ला २२ एप्रिलला झाला. या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने काल रात्री नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेसह अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन म्हणजे झुंडीने ड्रोन्स पाठवले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठानकोटमध्ये भारतीय सैन्याच्या एअर डिफेंस यूनिट्सने काऊंटर-ड्रोन ऑपरेशनमध्ये 50 पेक्षा अधिक ड्रोन्स पाडले.
भारत-पाक तणावाचा विमानसेवेला फटका; तब्बल 430 विमानांची उड्डाणं रद्द तर 27 विमानतळ करण्यात आली बंद
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान जगभरात दहशतवाद्यांना पोसत असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच पाकिस्तानी सोशल मीडियावर खोट्या बॅटमुले पसरवत मुस्लिम देश आणि युरोपियन राष्ट्रात सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर भारतीय परराष्ट्र खाते आणि लष्कराने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पुराव्यांसह पाकड्यांना उघडे नागडे करण्यात आले. आता एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी पाकिस्तान हा विश्वासघातकी असल्याने त्याविषयी सुद्धा खबरदारी घेण्याचे सूतोवाच केले आहे.
काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी?
“आपल्या सर्वांना वाटत आहे की, पाकिस्तान गुडघ्यावर आला आहे. पण असे नाही. कोणत्याही भ्रमात राहू नका. अमेरिकेने हाफिज सईद याच्या मुलाला दहशतवादी घोषित केले आहे. पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी मारल्या गेले. त्यांच्या अंत्यविधी यात्रेत- नमाजे जनाजा मध्ये सईदचा मुलगा आला. त्याच्यासोबत पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि इतर अनेक दहशतवादी आल्याचे दिसून आले आहे. हाच पाकिस्तानचा खरा चेहरा आहे. त्यामुळे आपण कोणत्याही भ्रमात राहू नये. हे लोक अद्याप गुडघ्यावर आलेले नाहीत.” असे प्रांजळ मत खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले.