This Nameless peak of Arunachal will now be named after the 6th Dalai Lama
तेजपूर (आसाम): पश्चिम अरुणाचल प्रदेशातील तवांग-पश्चिम कामेंग भागातील गोरीचेन पर्वतरांगातील एका शिखराला सहावे दलाई लामा त्सांगयांग ग्यात्सो यांचे नाव देण्यात आले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स (NIMAS) च्या 15 सदस्यांच्या टीमने 15 दिवसांच्या दीर्घ ट्रेकनंतर हिमालयातील गोरीचेन पर्वत रांगेतील 20,942 फूट उंचीच्या अज्ञात शिखरावर यशस्वी चढाई केली.
संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी एका निवेदनात सांगितले की, हे शिखर या क्षेत्रातील सर्वात तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि अज्ञात शिखरांपैकी एक आहे. ते म्हणाले, “उंच बर्फाचे खडक, धोकादायक खड्डे आणि 2 किमी लांब हिमनदी यासह अनेक आव्हानांवर मात केल्यानंतर, संघाने 6 व्या दलाई लामा, रिगेन त्सांगयांग ग्यात्सो यांच्या सन्मानार्थ शिखराला ‘त्सांग्यांग ग्यात्सो पीक’ असे नाव देऊन ही महत्त्वपूर्ण कामगिरी अमर केली.
निमासचे उद्दिष्ट
कर्नल रावत म्हणाले की, सहाव्या दलाई लामा यांच्या नावाने शिखराला नामकरण करून मोनपा समुदायासाठी आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या सखोल योगदानाला आदरांजली वाहण्याचे निमासचे उद्दिष्ट आहे.
त्सांगयांग ग्यात्सो शिखर
ते म्हणाले की “त्सांगयांग ग्यात्सो शिखर” जिंकण्याची मोहीम ही निमास संघाने हाती घेतलेल्या आतापर्यंतच्या सर्वात कठीण मोहिमांपैकी एक होती. हा मार्ग धोकादायक खड्डे, खडकाळ बर्फाचा खडक आणि प्रतिकूल हवामानाने भरलेला होता. मात्र, जिद्द आणि सांघिक कार्याच्या जोरावर या आव्हानांवर मात करून शिखर गाठण्यात संघ यशस्वी ठरला.
हे देखील वाचा : तर मंगळ ग्रहावर ‘असे’ संपले जीवन? शास्त्रज्ञांचा याबाबत मोठा खुलासा
भारतातील साहसी आणि गिर्यारोहण क्षेत्रात आघाडीवर असलेल्या NIMAS ने गिर्यारोहण आणि शिखराला नाव देण्याच्या निर्णयाबाबत इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन (IMF) ला माहिती दिली आहे. रावत म्हणाले की, ‘त्सांग्यांग ग्यात्सो शिखर’ अधिकृत नकाशावर ओळखले जावे यासाठी पर्वत शिखराचे नामकरण करण्यासाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण केली जात आहे.
हे देखील वाचा : अवघ्या 6 सेकंदात उध्वस्त झाले मलेशियातील सर्वात मोठे स्टेडियम; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्री पेमा खांडू काय म्हणाले?
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या अभूतपूर्व यशाबद्दल NIMAS टीमचे अभिनंदन केले आणि 6 व्या दलाई लामा त्संगयांग ग्यात्सो यांच्या नावावरून शिखराचे नाव दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पेमा खांडू म्हणाले की परमपूज्य त्सांगयांग ग्यात्सो हे या भागातील लोकांसाठी दीर्घकाळ शहाणपण आणि सांस्कृतिक अभिमानाचे स्रोत आहेत. त्यांची शिकवण आणि तत्वज्ञान आम्हाला मार्गदर्शन करत राहील आणि हे शिखर त्यांच्या चिरस्थायी वारशाचा दाखला असेल.