
पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरु असतानाच पुन्हा दोन पेपर लीक; परीक्षाच करावी लागली रद्द
देहरादून : दिल्लीतील जंतर मंतरवर पेपरफुटीविरोधात सध्या आंदोलन सुरु आहे. या पेपरफुटीच्या निषेधार्थ असंख्य तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. दिल्लीत आंदोलन सुरु असतानाच उत्तराखंडमध्ये आणखी एका पेपरफुटीची बातमी समोर आली आहे. उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये अभियांत्रिकीचे दोन पेपर फुटल्याचा आरोप आहे. यानंतर, विद्यापीठाने दोन्ही विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक आशिष कुमार हे शिवालिक कॉलेजमध्ये प्राध्यापक असून, ते प्रश्नपत्रिका तयार करणारे पेपर सेटर म्हणून काम करत होते. कॉलेजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर विद्यार्थ्यांना सारखेच प्रश्न पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यानंतर, दोन्ही पेपर रद्द करण्यात आले असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. या घटनेत कॉलेजच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. देशभरात सध्या पेपरफुटीचे जे वातावरण आहे ते पाहता हा विषय आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कुलगुरूंनी सांगितले की, परीक्षा ऑगस्टमध्ये घेतली जाईल आणि नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तसेच अशा शिक्षकांना आमच्या परीक्षांमध्ये कधीही सहभागी होऊ न देणे हे आमचे नैतिक कर्तव्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ज्या महाविद्यालयातून हे शिक्षक आले आहेत, त्यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा. आम्ही महाविद्यालयाला सांगितले आहे की, त्यांनी केलेल्या कारवाईवर आम्ही समाधानी नाही. फुटलेला पेपर त्याच महाविद्यालयातून होता. तपासाअंती आम्हाला असे आढळून आले की, यापूर्वीच एक पेपर फुटला होता, त्यामुळे तो पेपरही रद्द करण्यात आला.
कोणत्या विषयाचा पेपर फुटला?
शिवालिक कॉलेजमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या एका पेपरबाबत तक्रारी करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आरोप केला की, ‘मशीन लर्निंग फॉर इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या विषयाचा पेपर आधीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला होता. शिवालिक अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक आशिष कुमार गुप्ता यांनी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्नपत्रिका पाठवली होती, ज्यात ९०% प्रश्न सारखेच होते.