Western Vixam's impact grows as heavy rains and hailstorms hit Rajasthan
जयपूर : राजस्थानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. अनेक जिल्ह्यांत पाऊस आणि गारपीटीमुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे, तर काही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी वातावरण स्वच्छ राहील, मात्र सोमवारपासून पुन्हा पावसाची शक्यता आहे.
गारपिटीने अलवरमध्ये काश्मीरसारखे दृश्य
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. गुरुवारी उत्तर राजस्थानच्या काही जिल्ह्यांत हलका पाऊस झाला, तर शुक्रवारी बिकानेर आणि चुरूमध्ये गारपीट झाली. शनिवारी अनेक जिल्ह्यांत गारपिटीसह जोरदार पाऊस पडला. विशेषतः अलवरमध्ये झालेल्या गारपिटीमुळे संपूर्ण परिसर पांढऱ्या चादरीने झाकल्यासारखा दिसत होता. स्थानिक नागरिकांनी याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना “अलवर म्हणजे राजस्थानचे काश्मीर” असे म्हणत प्रतिक्रिया दिल्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : America Ukraine Tension : झेलेन्स्कींचा ‘प्लॅन बी’ तयार, ट्रम्प मदतीला न आल्यास युक्रेनला इतर पर्याय उपलब्ध
अलवर जिल्ह्यातील कोटकासिम, बेहरोर, खेडली आणि तिजारा भागांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, तिजारा आणि कोटकासिम भागातील सुमारे ९०% पिके उद्ध्वस्त झाली आहेत. हरभरा, बार्ली, मोहरी आणि गहू या रब्बी पिकांवर गारपिटीचा थेट परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
रविवारी स्वच्छ हवामान, सोमवारी पुन्हा पाऊस
हवामान खात्याच्या अहवालानुसार, रविवार, २ मार्च रोजी हवामान स्वच्छ राहणार आहे. दिवसभर कडक ऊन पडण्याची शक्यता आहे, परंतु सोमवारी हवामानात पुन्हा एकदा बदल होईल. सोमवार, ३ मार्चपासून बिकानेर आणि जोधपूर विभागातील काही जिल्ह्यांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण राजस्थानमध्ये उष्णतेची लाट, चित्तोडगडमध्ये ३६.६ अंश तापमानाची नोंद
राज्यातील उत्तर भागात पाऊस आणि गारपीट होत असताना, दक्षिण राजस्थानमध्ये उष्णतेची लाट जाणवली. राज्यातील १६ जिल्ह्यांत तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. चित्तोडगडमध्ये ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे या हंगामातील सर्वाधिक तापमान आहे. तसेच, बाडमेर आणि जैसलमेरच्या तापमानात थोडीशी घट झाली असून, बाडमेरमध्ये ३२.१ अंश सेल्सिअस आणि जैसलमेरमध्ये ३२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जयपूरमध्ये कमाल तापमान २७.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६.६ अंश सेल्सिअस राहिले.
राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान (अंश सेल्सिअस मध्ये):
अलवर – १८.४
जयपूर – १६.६
चित्तोडगड – १६.८
बाडमेर – २०.४
जैसलमेर – १८.८
जोधपूर – १७.६
बिकानेर – १७.७
गंगानगर – १२.७
माउंट आबू – १३.२
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाचा मोठा झटका; फेडरल टेहळणी प्रमुखांना हटवणे बेकायदेशीर ठरले
हवामानाचा तिव्र बदल
राजस्थानमध्ये हवामानाचा तिव्र बदल दिसून येत आहे. एका बाजूला उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये गारपिटीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, तर दक्षिणेकडील भागांत उन्हाचा चटका वाढत आहे. हवामान विभागाने सोमवारी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.