'चिप असो वा शिप' सर्व देशातच बनावं : पंतप्रधान मोदी
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘समुद्र ते समृद्धी’ कार्यक्रमातही सहभाग घेतला. 34200 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यानंतर, पंतप्रधान मोदींनी एका सार्वजनिक सभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हा कार्यक्रम भावनगरमध्ये होत आहे, पण तो संपूर्ण देशासाठी आहे. समुद्रापासून समृद्धीकडे जाण्याच्या आपल्या दिशेने संपूर्ण भारताचे प्रतिबिंब पडण्यासाठी भावनगरला या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे केंद्र म्हणून निवडण्यात आले आहे’.
तसेच गुजरात आणि भावनगरच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन. 17 सप्टेंबर रोजी तुम्ही सर्वांनी पाठवलेल्या शुभेच्छा, देश आणि जगभरातून मला मिळालेल्या शुभेच्छा…प्रत्येकाचे वैयक्तिकरित्या आभार मानणे अशक्य आहे. मात्र, भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून मला मिळालेले प्रेम आणि आशीर्वाद अफाट आहेत. ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे, ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. म्हणूनच, आज मी देश आणि जगातील सर्व मान्यवरांचे जाहीरपणे मनापासून आभार मानतो. आज भारत जागतिक बंधुत्वाच्या भावनेने पुढे जात आहे. जगात आपला कोणताही मोठा शत्रू नाही’.
हेदेखील वाचा : PM Modi Wife Jashodaben: १,६८,००० रुपये पेन्शन! पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांना इतर कोणत्या सुविधा मिळतात?
ते पुढे म्हणाले, ‘खऱ्या अर्थाने, जर आपला कोणी शत्रू असेल तर तो म्हणजे इतर देशांवरील आपले अवलंबित्व…हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे आणि आपण एकत्रितपणे भारताच्या या शत्रूला पराभूत केले पाहिजे. परकीय अवलंबित्व जितके जास्त असेल तितकेच देशाचे अपयशही जास्त असेल. जगातील शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी…जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या देशाने स्वावलंबी बनले पाहिजे. ‘चिप असो वा शिप’ सर्व देशातच बनावं’.
स्वावलंबी भारत बनवा
आपण 1.4 अब्ज देशवासियांचे भविष्य इतरांवर किंवा त्यांच्या अवलंबित्वावर सोडू शकत नाही. भावी पिढ्यांचे भविष्य पणाला लावता येणार नाही. 100 समस्यांवर एकच इलाज आहे आणि तो म्हणजे स्वावलंबी भारत. म्हणून, आपण आव्हानांना तोंड दिले पाहिजे आणि भारताने स्वावलंबी होऊन जगासमोर उभे राहिले पाहिजे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.