कोण आहेत सीपी राधाकृष्णन? फोटो सौजन्य: @CPRGuv (X.com)
CP Radhakrishnan marathi news: 21 जुलै रोजी जगदीप धनखड यांनी अचानक आरोग्याच्या कारणावरून त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. अशातच भारतीय जनता पक्षाने त्यांच्या उपराष्ट्रपती उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत सीपी राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपती उमेदवारासाठी घोषित केले आहे. सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहे. याआधी त्यांनी झारखंडच्या उपराज्यपाल पदाची देखील जबाबदारी सांभाळली आहे. तसेच ते दोनदा लोकसभेचे खासदार म्हणूनही निवडून आले आहेत. चला त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन हे सीपी राधाकृष्णन यांचे पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी झाला. राधाकृष्णन हे 31 जुलै 2024 पासून महाराष्ट्राचे 24 वे आणि सध्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 पर्यंत झारखंडचे राज्यपाल आणि मार्च 2024 ते जुलै 2024 पर्यंत तेलंगणाचे राज्यपाल आणि पाँडिचेरीचे उपराज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. राधाकृष्णन हे भाजपचे सदस्य होते. त्याच दरम्यान ते कोइम्बतूरमधून दोनदा लोकसभेवर निवडून आले होते. ते तामिळनाडूचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष देखील होते.
सीपी राधाकृष्णन यांनी 5 वेळा लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, ते फक्त दोनदाच जिंकले आहेत. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदाच कोइम्बतूरमधून विजयी झाले. त्यानंतर त्यांनी 1999 च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला. मात्र, 2004, 2014, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री अचानक राजीनामा जाहीर केला. त्यांचा राजीनामा उपराष्ट्रपतींच्या अधिकृत एक्स हँडलवर दिसला. राष्ट्रपतींना लिहिलेल्या या राजीनामा पत्रात जगदीप धनखड यांनी त्यांच्या प्रकृतीचा हवाला दिला आहे. जगदीप धनखड यांनी संविधानाच्या 67 (अ) चा हवाला देऊन राष्ट्रपतींना राजीनामा सादर केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आणि म्हणाले, “मी पदावर असताना खूप काही शिकलो”.