जम्मू-काश्मिरात 'इंडिया' आघाडी लढणार; एनसी आणि काँग्रेसची आघाडी निश्चित
श्रीनगर : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे देशातील ज्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या जिंकण्यासाठी इंडिया आघाडीने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्ष एकत्र लढवतील, अशी घोषणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) पक्षाचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी गुरुवारी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत एनसी आणि काँग्रेसची आघाडी निश्चित झाली असून, लवकरच निवडणूक टप्पानिहाय उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल, असेही त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले. तसेच जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत जिंकलो तर संपूर्ण भारत आपल्या ताब्यात येईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
राहुल गांधी आणि खर्गे जम्मू- काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. 21 ऑगस्टच्या संध्याकाळी दोन्ही नेते श्रीनगरला पोहोचले. दोन्ही नेत्यांनी दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांची भेट घेतली. दरम्यान, जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असून तीन टप्प्यांत मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.
लोकांच्या वेदना दूर करणे हेच ध्येय
मी संपूर्ण देशात लोकशाहीचे रक्षण करतो, • जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या मनातील वेदना पुसून टाकणे हे माझे ध्येय आहे. काँग्रेस पक्षाला तुम्हाला जे काही सहन करावे लागते. तुम्ही ज्या भीतीत जगता, तुम्हाला वाटत असलेली दुःख मिटवायची आहेत. प्रेमाने द्वेषाचा पराभव करू.
– राहुल गांधी, विरोधी पक्षनेते