Jk Election 2024: जम्मू काश्मीर विधानसभेसाठी मतदान पूर्ण; ८ ऑक्टोबरला येणार महानिकाल
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीससाठी एकूण तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार होते. त्यातील आज जम्मू काश्मीर विधानसभेच्या ४० जागांसाठी तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तिसऱ्या टप्प्यात जवळपास 39 लाखांपेक्षा जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अंतिम टप्प्यात ४० जागांसाठी ४१५ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान आज तिसऱ्या टप्प्यासाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये ६५.४८ टक्के मतदान पार पडले.तसेच तीनही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे.दरम्यान ८ तारखेला निकाल जाहीर होणार आहे.
केंद्रशासित प्रदेशातील ३९.१८ लाखांहून अधिक मतदारांनी ४१५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले आहे. या उमेदवारांमध्ये तारा चंद आणि मुझफ्फर बेग या दोन माजी उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा या तीन सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही मतदान पार पडले. ज्या विधानसभा मतदारसंघात मतदान झाले, त्यामध्ये बारामुल्ला जिल्ह्यातील बारामुल्ला, उरी, रफियााबाद, पट्टण, गुलमर्ग, सोपोर आणि वाघोरा-क्रेरी, कुपवाडा जिल्ह्यातील कुपवाडा, कर्नाह, त्रेहगाम, हंदवाडा, लोलाब आणि लंगेट आणि बांदीपोरा जिल्ह्यातील बांदीपोरा, सोनवारी यांचा समावेश आहे. आणि गुरेझ यांचा समावेश आहे.
२०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच मतदानाचा हक्क मिळालेले उत्साही, पश्चिम पाकिस्तानी निर्वासित, वाल्मिकी समाज आणि गोरखा समाजाचे सदस्य मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी सकाळीच पोहोचले. यापूर्वी त्यांनी २०१९ आणि २०२० मध्ये अनुक्रमे ब्लॉक विकास परिषद आणि जिल्हा विकास परिषद निवडणुकीत मतदान केले होते. मतदानादरम्यान सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी निमलष्करी आणि सशस्त्र पोलिस दलांसह सुरक्षा दलांच्या ४०० हून अधिक कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
जम्मू काश्मीर विधानसभेसाठी तीनही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळात संपूर्ण राज्यात अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी कुरापती काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा यंत्रणांनी त्यांना वेळीच बंदोबस्त केला. दरम्यान आता ८ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकाल काय येणार याबद्दल सर्वांना चिंता लागली आहे. सर्वच पक्ष विजयी होतील या विश्वासात निवडणूक लढले आहेत, मात्र आता नक्की सत्ता कोणाची येणार हे ८ ऑक्टोबर रोजीच कळणार आहे.