जोधपूर : राजस्थान येथील जोधपूरमध्ये एका लग्न समारंभात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास ६० जण होरपळले असून यात २ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी दुपारी ३:१५ च्या सुमारास ही घटना घडली असून यात जखमींमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.
जोधपूर येथील एका घरी लग्न सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास १०० पाहुण्यांची लग्नसोहोळ्याला उपस्थिती होती. लग्न समारंभाच्या वेळी महिला हॉलमध्ये बसून बोलत होत्या. स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गळती होऊन ही आग लागली. एकामागोमाग एक स्फोट होऊ लागले. तब्बल 5 सिलिंडरचा स्फोट झाला आहे. यावेळी लागलेल्या आगीत जखमींमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Jodhpur, Rajasthan | Around 60 people injured after a house caught fire during a wedding in Bhungra village
It’s a very serious accident. 42 people out of the 60 injured were referred to MGH hospital. Treatment is going on: Himanshu Gupta, District Collector (08.12) pic.twitter.com/9DYKOeHFrE
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 9, 2022
आगीत जखमी झालेल्या लोकांना शेरगड येथे आणण्यात आले. तर काही लोकांना जोधपूर येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या बर्न युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता रुग्णालयात पोहोचले. डॉ. एसएन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य दिलीप कछावा यांनी सांगितले की, ६० जखमींपैकी ५१ जणांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ८ जण ९० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. वॉर्डमध्ये ४८ जण दाखल आहेत, १ मुलगा आयसीयूमध्ये आहे. तर 5 जणांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. दोघांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून अपघाताची संपूर्ण माहिती घेतली. उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना दिल्या.