सातारा : श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे उर्फ दादा महाराज यांनी नगराध्यक्ष म्हणून सातारा शहरासाठी काम करताना लोक कल्याणाचा विचार नेहमी समोर ठेवला. त्यांचे विचार आजच्या राजकारणातही आम्हाला सातत्याने प्रेरणादायी ठरत आहेत, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे उर्फ दादा महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त उदयनराजे यांनी अभिवादन केले. कॅम्प सदर बाजार येथील आयुर्वेदिक गार्डनमध्ये ऍड. दत्ता बनकर आणि मित्र समूहाच्या वतीने दादा महाराजांना अभिवादन आणि येथील डिजिटल लायब्ररीच्या इमारतीचे उद्घाटन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण आयुर्वेदिक गार्डनची उदयनराजे यांनी पाहणी करून दादा महाराजांच्या 44 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष ऍड. दत्ता बनकर माजी शिक्षण सभापती सुनील काटकर विनीत पाटील आणि गोडोली परिसरातील सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते.
उदयनराजे भोसले यावेळी बोलताना पुढे म्हणाले, दादा महाराज यांचे लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने सातारा शहराच्या नगरीमध्ये मोठे योगदान आहे. कधीकाळी अडचणीच्या वेळी स्वतः पदरमोड करून दादा महाराजांनी सातारा पालिकेच्या कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडवला होता. लोककल्याण करणे आणि त्यासाठी पराकोटीचा प्रयत्न हे त्यांच्या कामाचे सूत्र होते. त्यांचे लोककल्याणाचे विचार आजही आजच्या राजकारणामध्ये आम्हाला प्रेरणादायी ठरतात. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आयुर्वेदिक गार्डनमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अभ्यासिका तसेच डिजिटल लायब्ररी असा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सर्व बांधकामांची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी करत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. साताऱ्याचा युवावर्ग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून थेट केंद्रीय व राज्यस्तरीय प्रशासनात दाखल व्हायला हवा, अशी अपेक्षा यावेळी उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
सातारा शहरात अशा अभ्यासिका निर्माण झाल्यास सातारा जिल्हा प्रशासकीय सेवेत वेगळी मानदंड निर्माण करू या कामांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. यामुळेच हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभा राहिला, असे दत्ता बनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.