"आगामी निवडणुकीसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी..."; फडणवीसांचे अक्कलकोटमध्ये महत्वाचे विधान
सोलापूर: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची, कोणती जागा कोणत्या पक्षाला द्यायची यासंदर्भात चर्चा, बैठका सुरू आहेत. दरम्यान महायुतीमध्ये विद्यमान आमदार ज्या पक्षाचा असेल ती जागा त्या पक्षाला ती जागा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी या ठिकाणी भाजपचा उमेदवार कोण असणार आहे, याबद्दल भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटमध्ये अनेक विकासकामांचे भूमिपूजन केले. यावेळेस ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेवटचा तालुका म्हणून अक्कलकोटकडे फारच दुर्लक्ष केले गेले. विकासनिधी येतच नव्हता. पण आम्ही अक्कलकोट तालुका शेवटचा नाही तर विकासाची सुरवातच अक्कलकोट पासुन केली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पाणीदार आमदार म्हणून प्रतिमा निर्माण केली असुन ते लोकप्रिय आमदार आहेत. त्यांनी पहिल्या पाचच वर्षात बहुतांश सर्व कामे मंजुर करून घेतली. पुढील पाच वर्षात काहीतरी कामे करण्यास ठेवा. ”
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार कल्याणशेट्टी हेच भाजपाचे उमेदवार असल्याचे व तेच निवडून येणार असल्याचे अप्रत्यक्ष उपमुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांनी सुचित केले. आदर्श आमदार कसा असावा असे जर कोणी मला विचारले तर मी सांगेन आदर्श आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासारखा असावा, असे गौरवपूर्ण प्रतिपादन उपमुख्यमंत्री देदेद्र फडवणीस यांनी केले. तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे विविध विकास कामाचे भुमिपुजन आ सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्य पुस्तिका अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी फडवणीस बोलत होते.
हरयाणा निवडणुकीवर फडणवीस काय म्हणाले?
आज प्रचंड मोठा विजय साजरा करण्यासाठी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. आज पुन्हा एकदा हरयाणाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे हरयाणामध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होते आहे. आम्ही लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षमुळे हरलो नाही. कोणत्याही विरोधी पक्षात आम्हाला हरवण्याची ताकद नाही. आम्ही केवळ फेक नरेटीव्हमुळे हरलो. फेक नरेटीव्हमुळे लोकसभेत देशात आपल्या काही जागा कमी झाल्या आहेत. आता आपण महाराष्ट्र आणि देशभरात ठरवले आहे. आता आपण फेक नरेटीव्हला थेट नरेटीव्हने उत्तर द्यायच आहे. याची पहिली कसोटी हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होती. हरयाणाच्या निकालावर महाविकास आघाडीचे नेते काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहीत होते. सकाळी ९ वाजताचा भोंगा हा रात्रीपासून तयारी करून बसला होता. आता काय काय बोलू आणि काय नको असे त्याला वाटत होते. आता मला त्यांना विचारायच आहे की आता कस वाटतंय? जनतेशी बेईमानी करून निवडून आलेल्या लोकांना जनता आता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे.