
भिवंडी : भिवंडी तालुका म्हणजे गोदाम व्यवसाय फोफावल्याने झपाट्याने लोकसंख्या वाढ झाल्याने ग्रामीण भागाचे रूपांतर शहरीकरणाच्या दिशेने सुरू असताना दाट लोकवस्तीच्या शहरात कोरोना विषाणू फोफावत असताना भिवंडी ग्रामीण ही त्यास अपवाद न ठरता ,एखाद्या जिल्ह्यात वाढलेल्या रुग्ण संख्ये एवढे रुग्ण एकट्या भिवंडी ग्रामीण भागात आढळून आले आहेत. २२ जुलै रोजी पर्यंत तालुक्याच्या ग्रामीण भागात २५७४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून त्यापैकी १५१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ९८८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाच्या विळख्याने ग्रामीण भागात ६८ जणांचा मृत्यु झाला असून या परिस्थितीला हाताळण्या साठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. तालुक्याचा आवाका पाहता आठ प्राथमिक आरोग्य केंद्र ५१ उपकेंद्रा मधून १७ डॉक्टर्स , समुदय आरोग्य अधिकारी म्हणून २४ डॉक्टर्स ,६६ आरोग्य सेविका व ३२३ आशा वर्कर्स सेवा देत आहेत परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रां मधील समाविष्ट ग्रामपंचायती व तेथील लोकसंख्या पाहता ही यंत्रणा तोकडी पडत आहे. उदाहरण दाखल खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कशेळी काल्हेर पासून कारीवली पर्यंतच्या गावांचा समावेश होत असून या भागातील लोकसंख्या किमान एक लाख असू शकते त्यासाठी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी यांनी द्यायच्या म्हंटल्या तरी कोणत्याही सुविधा देऊ शकत नाही हे वास्तव आहे.
भिवंडी तालुक्यात सध्या कोरोना रुग्ण वाढ होत असताना त्यास अटकाव घालण्यासाठी यंत्रणेकडे नियोजनाचा अभाव आढळून आला. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील रुग्णालय उपचार करण्यासाठी दाखल करून घेत नसताना ग्रामीण भागातील रुग्णांनी उपचार करून घेण्यासाठी जायचे कोठे हा प्रश्न आज ही जनतेला भेडसावत आहे. जिल्हा प्रशासन या बाबींवर कधी गांभीर्य बाळगून असल्याचे दिसलेच नाही त्यामुळे तर कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी अलगिकरण व विलगिकरण कक्षाची वानवा होती .
त्यासाठी पाठपुरावा केल्या नंतर टाटा आमंत्रण येथे १७० बेड ठाणे ग्रामीण साठी अलगिकरण कक्षासाठी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तेवढ्याने समस्या संपली नसून आज ही ग्रामीण भागातील रुग्णांची ससेहोलपट सुरूच आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भिवंडी येथील आढावा बैठकी दरम्यान ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विशेष व्यवस्था म्हणून शहापूर येथे चाचणी प्रयोगशाळा पंधरा दिवसात कार्यान्वित करण्याची घोषणा केली महिना झाला पण कार्यवाही शून्य असतानाच तालुक्यात किमान रॅपिड अँटिजेंन चाचणी किट्स तरी उपलब्ध करून घ्यावेत तर त्या बाबत ही बोंब असल्याने आज ही रुग्णांना फक्त टाटा आमंत्रण व आयजीएम कोव्हिडं हॉस्पिटल या दोन ठिकाणीच चाचणी सुविधा उपलब्ध असल्याने आज ही तालुक्यात चाचण्यांच्या अभावी रुग्ण शोधण्यात अडचणी येत आहेत .
सध्या तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा प्रशासना कडून फक्त भिनार या ठिकाणी २०८ बेड चे कोव्हिडं केअर सेंटर बनविण्यात आले असून त्या ठिकाणी अवघे १० ऑक्सीजन बेड आहेत. त्यानंतर गणेशपुरी येथील नित्यानंद हॉस्पिटल येथे २०० बेड चे सीसीसी व १०० बेड चे डिसिएचसी बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून काल्हेर येथे एक खाजगी इमारती मध्ये किमान १०० बेड चे सीसीसी बनविण्यास परवानगी दिल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांनी देत या सोबतच जिल्हा आरोग्य यंत्राने कडून सवाद या गावात तब्बल ९०० बेड चे DCHC व CCC बनविण्यास सुरवात केली असल्याची माहिती दिली. तालुक्यात सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय फक्त ८ रुग्णवाहिका कोव्हिडं व्यतिरिक्त रुग्णां साठी उपलब्ध असून १०८ अंतर्गत उपलब्ध असलेल्या ५ रुग्णवाहिका या कोव्हिडं रुग्णांसाठी वापरल्या जात असल्याने आज ही तालुक्यात रुग्णवाहिकेची वानवा आहे.
तालुक्याच्या एक टोकाला सवाद येथे कोव्हिडं केंद्र उभारणी म्हणजे पैशांचा अपव्यय
तालुक्यातील ग्रामीण भागाचा पसारा पाहता तालुक्यातील किमान कशेळी, अंबाडी,पडघा, कोनगाव, मानकोली, खारबाव या यांच्या नजीकच्या परिसरातच रुग्ण व संशयित रुग्ण यांची व्यवस्था होणे गरजेचे असताना तालुक्याच्या एक टोकाला असलेल्या सवाद येथे ९०० बेड चे कोव्हिडं केंद्र उभारण्याचा घाट कोणाच्या समाधाना साठी जिल्हा प्रशासन करतोय असा सवाल उपस्थित होत आहे. तालुका मुख्यालय असलेल्या ठिकाण पासून किमान १५ किमी अंतरावर असलेल्या सवाद येथील कोव्हिडं केंद्रात चिंबिपाडा ,खारबाव ,कशेळी येथील रुग्ण पोहचणार कसा त्याला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नसताना हा अट्टाहास का ? त्या सोबत एवढ्या मोठ्या केंद्रासाठी आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स , इतर व्यवस्था करण्यासाठी मनुष्यबळ आणणार कोठून हे प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. त्यापेक्षा खारबाव रस्त्यावरील पाचगाव शांतता समिती सभागृह ,मानकोली येथील आर सी पाटील फाऊंडेशन सभागृह ,दुगाड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गोदाम पडघा व काल्हेर येथे एखादं गोदाम अधिग्रहित करून त्या ठिकाणी किमान १०० बेड च्या कोव्हिडं केअर सेंटरची उभारणी केल्यास रुग्णांना त्यांच्या परिसरात उपचार घेत येतील व त्यासाठी टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ उपलब्ध करून सोयी सुविधा सुरू करता आल्या असत्या परंतु सवाद येथील गोदमात एकाच ठिकाणी एवढे मोठे कोव्हिडं केअर केंद्र बनविणे हे पैशांचा अपव्यय असून अव्यवहार्य वस्तुस्थितीला धरून नसल्याचे प्रकर्षाने जाणवते.
प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय २० जुलै पर्यंत सांख्यिकी कोरोना स्थिती
प्राथमिक आ कें रुग्ण मयत डिस्चार्ज ऍक्टिव्ह
एकूण मयत डिस्चार्ज एकटीव्ही
१ ] खारबाव – ९३२ – १९ – ५०२ – ४११
२ ] कोनगाव – ४८१ – १० – २५६- २१५
३ ] अनगाव – २९३ – १३- १७२ – १११
४ ] चिंबीपाडा -१२४ – ०४ – ०७२ – ०४८
५ ] पडघा – ११३ – ०५- ०८३ – ०२५
६ ] दिवेअंजुर – ४१९ – १३ – ३१२ -० ९४
७ ] वज्रेश्वरी – ५७ – ०१ – ०४३ – ०१३
८ ] दाभाड – ४८ – ०० – ०३५- ०१३
एकूण – २४७० – ६५ – १५१६ – ९३०