पुणे : पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सुतावरून स्वर्ग गाठत पुण्यातील मुळशी तालुक्यात गांजाची शेती केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आणला आहे. शेतात तब्बल अडीचशे झाडांची लागवड करण्यात आल्याचे समोर आले असून, पोलीसांनी घरातून देखील १८ किलो गांजा पकडला आहे. या गांजा शेतीने मुळशीसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
चेतन मारूत मोहोळ (वय २७, रा.कोथरूड), साहेबा हुलगप्पा म्हेत्रे (वय २०) दोघांना पहिल्यांदा अटक केली. त्यानंतर प्रकाश वाघोजी खेडेकर (वय ३५), इंदुबाई (वय ६५) यांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात गांजा तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे गेल्या काही घटनांवरून दिसत आहे. त्याअनुषंगाने पोलीसांकडून माहिती काढली जात आहे. यादरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कोथरूड परिसरात दोन तरूणांकडे गांजा असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पथकाने याठिकाणी सापळा रचत चेतन मोहोळ व साहेबा म्हेत्रे या दोघांना पकडले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे अर्धा किलो गांजा मिळून आला. त्यांना ताब्यात घेऊन सखोल तपास केला. त्यावेळी या दोघांनी हा गांजा मुळशी तालुक्यातील आंबेटवेट गावातून आणला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी या गावातून माहिती काढली असता येथील गवळीवाडा येथे खेडेकर कुटुंबाकडे गांजा असल्याचे समजले.
पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्यांना घरातच १८ किलो गांजा मिळाला. त्यांच्याकडून हा गांजा या दोघांना विकण्यात आला होता. पोलिसांनी त्यांच्याकडे या गांजाबाबत चौकशी केली. त्यावेळी पोलिसांना त्यांनी गांजाची शेतीच दाखविली. शेतीची पाहणी केल्यानंतर पोलिसांना मोठ्या प्रमाणात गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे दिसून आले. त्यानुसार, या माय-लेकरांना पकडण्यात आले आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.






