ममता बॅनर्जीच्या आरोपावर निर्मला सीतारमण यांचे प्रत्युत्तर
दिल्ली : दिल्लीमध्ये नीति आयोगाची बैठक ही आज राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. विरोधकांनी नीति आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यामुळे ही बैठक लक्षवेधी ठरली. मात्र यामध्ये विरोधकांमध्ये दुमत झाले आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. ममता बॅनर्जी या उपस्थित राहिल्या देखील होत्या मात्र त्यांना बोलण्यासाठी फक्त पाच मिनिटांचा वेळ दिल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. केंद्र सरकारवर अपमान केल्याचा आरोप करत त्या बैठकीतून बाहेर पडल्या. या आरोपांवर भाजप नेत्या व केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलायला वेळ दिला नाही. माझा माईक बंद करण्यात आला असा आरोप त्यांनी केला. यावर उत्तर देताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, “NITI आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. आम्ही सर्वांनी त्या काय बोलतात ऐकले. प्रत्येक मुख्यमंत्र्यांना प्रत्येक टेबलवर बसवलेल्या स्क्रीनवर दिसणारा वेळ देण्यात आला होता. त्यांचा माईक बंद झाल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. हे पूर्णपणे खोटे आहे. सर्व मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी योग्य वेळ देण्यात आला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा माईक बंद असल्याचा दावा केला होता, ते खरे नाही. त्यांनी खोट्या गोष्टींवर नॅरेटीव्ह तयार करण्याऐवजी खरे बोलावे,” असे मत निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले.
सत्ताधारी नेत्यांकडून ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, “ममता बॅनर्जी जे बोलत आहेत ते पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. त्यांनी स्वतः सांगितले की त्यांना लवकर निघायचे आहे म्हणून त्यांना आधी बोलू द्यावे. त्यांना पूर्ण वेळ देण्यात आला. त्यांची बेलही वाजली नव्हती. त्यांनी मनोगत व्यक्त केले. मग त्या बाहेर आल्या आणि त्यांना जे करायचे ते केले. ही अत्यंत खेदाची बाब आहे.”
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “नीति आयोगाच्या बैठकीत काय झाले ते मी पाहिले नाही. मी एवढेच म्हणेन की ही तथाकथित इंडी आघाडी ही युती नाही कारण ममतांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला एकही जागा दिली नाही. त्यांना जनतेचा जनादेश पचवता येत नाही आणि म्हणून ते राडा करत आहेत,” अशा शब्दांत प्रल्हाद जोशी यांनी निशाणा साधला.