ncp eknath khadse reaction on rave party arrest to pranjal khawalkar
Eknath Khadse Marathi News : पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे सध्या चर्चेमध्ये आले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हे कथित रेव्ह पार्टीमध्ये रंगेहात पकडले गेले आहेत. पुणे पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये त्यांना अटक करण्यात आली. यावरुन जोरदार राजकारण तापलेले असताना आता एकनाथ खडसे यांनी रोष व्यक्त केला आहे. माध्यमांशी संवाद साधून एकनाथ खडसे यांनी रेव्ह पार्टीबाबत आठ प्रश्न उपस्थित केले आहेत.
एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांच्या जावयाला केलेल्या अटकेवर संशय व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, “पोलिसांच्या कारभाराविषयी माझ्या मनात काही प्रश्न आहेत. जे माध्यमांमधून मला उपस्थित करायचे आहेत. तिथे पाच-सात जणांची पार्टी चालू होती. तिथं कुठलंही संगीत नाही, नृत्य नाही, कुठलाही गोंधळ नाही. एका घरात पाच-सात जण पार्टी करत होते, त्याला तुम्ही रेव्ह पार्टी कसं काय म्हणता? असं असेल तर देशात, राज्यात कुठेही पाच-सात जण मिळून पार्टी करत असतील तर त्याला रेव्ह पार्टी म्हणणार का? रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या काय ती पोलिसांनी स्पष्ट करावी. त्यामुळे रेव्ह पार्टी आयोजित केली म्हणून माझ्या जावयाची बदनामी करण्याचं प्रयोजन काय?” अशी प्रश्नांची सरबत्ती एकनाथ खडसे यांनी उपस्थित केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “पोलिसांनी ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईचे व्हिडीओ सुद्धा प्रसारमाध्यमांवर दाखवलं जात आहे. पोलिसांना या गोष्टी सार्वजनिक करण्याचा अधिकार कोणी दिला? एखाद्याच्या खासगी आयुष्यातील घटनांचं चित्रीकरण करून ते जगासमोर आणण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? पोलिसांनी निव्वळ बदनामीसाठी हे कृत्य केले आहे का? अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाईदरम्यान पोलिसांना संशयित आरोपींचा चेहरा दाखवण्याचा अधिकार नाही. महिला असो अथवा पुरुष, पोलीस कोणाचेही चेहरे दाखवता येत नाहीत. मात्र, या कारवाईदरम्यान पोलिसानी सर्व महिला व पुरुषांचे चेहरे दाखवले. कारवाईत पोलिसांनी बदनामी करण्याचे ध्येय ठेवल्याचं दिसत आहे.” असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, “पोलिसांनी या कारवाईत डॉ. प्राजंल खेवलकर यांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी का केलंय? त्यांच्याकडे कुठलाही अंमली पदार्थ सापडलेला नाही. त्यांच्यावर या आधी कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. तसेच ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत. उलट डॉ. खेवलकर हे वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेलं नाव आहे. पोलिसांनी दावा केला आहे की त्यांना या प्रकरणात एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये २.७ ग्रॅम अंमली पदार्थ सापडले आहेत. मग ती मुलगी पहिल्या क्रमांकाची आरोपी असायला हवी आणि डॉ. खेवलकरांना साक्षीदार करायला हवं होतं, कारण त्यांच्याकडे काहीच सापडलेले नाही.” असे देखील मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.