
वडूज : येथील नगरपंचायतीच्या (Vaduj Nagar Panchayat) नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीच्या साथीने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवारांना संधी दिल्याने नगराध्यक्षपदी मनिषा रविंद्र काळे तर उपनगराध्यक्षपदी मनोज कुंभार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणुकीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनिल गोडसे, आरती काळे, स्वप्नाली गोडसे, रोशना गोडसे, शोभा वायदंडे तसेच वंचितच्या शोभा बडेकर, अपक्ष राधिका गोडसे यांनी जाहीर समर्थन दिले होते. तर ऐनवेळी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक अभय देशमुख यांनीही सत्तेसोबत राहणे पसंत केले. निवड जाहीर होताच काळे व कुंभार समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल, भंडाऱ्याची उधळण करत जल्लोषी मिरवणूक काढली.
या मिरवणुकीत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, सुरेंद्र गुदगे, प्रा. बंडा गोडसे, हर्षदा देशमुख, हिंदुराव गोडसे, काँग्रेसचे नेते अशोकराव गोडसे, डॉ. महेश गुरव, वंचितचे जिल्हा अध्यक्ष शाकीरभाई तांबोळी, इम्तियाज नदाफ, तुषार बैले, युवा नेते पृथ्वीराज गोडसे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
समृध्द राजकीय वारसा
नूतन नगराध्यक्षा मनिषा व त्यांचे पती उद्योग व्यवसाया निमित्त बेंगलोरमध्ये वास्तव्यास असले तरी त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. काळे यांचे सासरे दिवंगत शंकरराव काळे (आप्पा) यांनी वडूज विकास सेवा सोसायटीचे संचालकपद भूषविले आहे. तर आजेसासरे दिवंगत बाळकृष्ण उर्फ किसनराव काळे हे १९६२ ते ६४ या काळात वडूजचे सरपंच होते. चुलत सासू रत्नमाला काळे या २००२ ते २००७ या काळात जिल्हा परिषद सदस्या होत्या. तर काळे यांच्या सख्या नणंद मेघा जीवनशेठ पुकळे या कलेढोण गणाच्या विद्यमान पंचायत समिती सदस्या आहेत.
विकासाचे नवे पर्व : देशमुख
जातीवादी विचार व धन शक्तीला बाजूला करण्यासाठी वडूजमध्ये अपक्ष व वंचित आघाडीच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची सत्ता स्थापन केली आहे. या निमित्ताने विकासाचे नवे पर्व उभे सुरू झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी व अपक्ष तीन उमेदवारांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांसमोर नवीन विकास आघाडीची नोंदणी केली आहे. त्यामुळे पाच वर्षे या आघाडीच्या माध्यमातून स्थिर शासन देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर विकासकामांना गती दिली जाईल. या पुढच्या काळात बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिला जाईल, असे मत राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.