mithi river bridge
मुंबई: भांडूप येथील पवई (Powai)परिसरात मिठी नदीवर(Bridge over Mithi River) १९४० साली बांधलेला पूल जीर्ण आणि धाेकादायक झाल्याने त्या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे. विक्रमी वेळेत व नियोजनानुसारच पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले असून या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक मार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
[read_also content=”आरारा खतरनाक – PUBG चा नवा विक्रम, २ आठवड्यांमध्येच तब्ब्ल २ मिलियन लोकांनी केलं प्री रजिस्ट्रेशन https://www.navarashtra.com/latest-news/pubg-break-all-records-with-20-million-pre-registration-nrsr-137549.html”]
भांडूपच्या एस विभागांतर्गत असणाऱ्या पवई परिसरात मिठी नदीवर साधारणपणे १९४० च्या सुमारास बांधलेला ब्रिटीशकालीन एक जुना पूल होता. हा पूल अति धोकादायक झाल्याने डिसेंबर २०२० मध्ये तोडण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या पूल खात्याद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केवळ ५ महिन्यांच्या अल्पावधीत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तब्बल ३४ मीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदी असणाऱ्या या नव्या पुलाचे बांधकाम सुरु असताना महापालिकेच्या संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी काहींना; तसेच सदर ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या आव्हानावर यशस्वीपणे मात करुन पुलाचे बांधकाम विक्रमी वेळेत व नियोजनानुसारच पावसाळ्यापूर्वी करण्यात आले. या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक मार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.
भांडूप फिल्टरपाडा परिसरातून जाणारा साकी विहार मार्ग आहे. या मार्गाद्वारे पश्चिम उपनगरातील आरे कॉलनी परिसराला जाता येते. याच मार्गादरम्यान असणाऱ्या मिठी नदीवर सन १९४० च्या सुमारास २० मीटर लांबी व ७ मीटर रुंदी असणारा पूल बांधण्यात आला होता. हा पूल डिसेंबर २०२० मध्ये धोकादायक म्हणून घोषित केला हाेता. त्यानंतर लगेचच हा पूल पाडण्यात आला. नव्या पुलाचे बांधकाम हे नुकतेच पूर्ण झाले असून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. विशेष म्हणजे जुन्या पुलाची रुंदी ही केवळ ७ मीटर इतकी होती, या तुलनेत नव्या पुलाची रुंदी ही २४ मीटर इतकी असल्याची माहिती पालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) राजेंद्रकुमार तळकर यांनी दिली.