मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाला देशात भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. मात्र दुसरीकडे हा चित्रपट काल्पनिक असल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत आहेत. यावर या सिनेमातील अभिनेत्री आणि विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या सिनेमासाठी करण्यात आलेल्या रिसर्चची माहिती त्यांनी दिली. तसेच या अभ्यासावेळी काश्मीरी पंडितांच्या अनेक करुण कहाण्याही त्यांनी एका मुलाखतीत सांगितल्या आहेत. हा सिनेमाची निर्मिती करण्यापूर्वी केलेल्या अभ्यासाचे ४ हजार तासांचे व्हिडिओ असल्याची माहितीही पल्लवी जोशी यांनी दिली आहे.
जगभरात फिरुन केले रिसर्च
या मुलाखतीत पल्लवी जोशीने या सिनेमासाठी कसा अभ्यास केला हेही सांगितले आहे. जगभरात अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर, जम्मू-काश्मीर, पुणे, थायलंड, दिल्ली या सर्व ठिकाणी फिरुन या सिनेमाआधी अभ्यास करण्यात आल्याचे पल्ल्वीने सांगितले आहे. ज्यांच्या भेटी घेतल्या त्यांचे आई-वडील, नातेवाईक यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या अनेक कहाण्या ऐकल्याचे त्यांनी सांगितले.
यातील अनेकांची हत्या करण्यात आली, किंवा अनेकांवर बलात्कार करण्यात आले असल्याचेही पल्लवीने सांगितले. अनेकांनी आपले अत्यंत प्रेमाने स्वागत केले आणि त्यांच्या बालपणीच्या कटू आठवणी आमच्यासमोर मोकळ्या भावनेने सांगितल्याचेही पल्लवीने सांगितले आहे.
आरोपांचे केले खंडन
ही कथा काल्पनिक नसल्याचे पल्लवी जोशीने स्पष्ट केले आहे. ज्या ज्या काश्मिरी पंडितांच्या वारसांशी आमची भेट झाली, त्यांच्या मुलाखती रेकॉर्ड केल्या असल्याचेही तिने सांगितले. अनेक व्हिडिओ त्यांच्याकडे असून, तेही जनतेसमोर येतील, असेही तिने सांगितले. या सिनेमात काही चुकीचे आहे असे कुणाला वाटत असेल, तर त्याने येऊन ४ हजार तासांचे व्हिडिओ फूटेज बघावे, असे आव्हानही तिने दिले आहे. हे सगळे अनुभव ऐकताना आपल्याला स्वताला खूप मोठा धक्का बसल्याचेही पल्लवीने सांगितले आहे.