
चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दप्तारातील 150 रूपये काढून घेतले अन्...
नाशिक : सिडको परिसरात कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये होणारी फ्री स्टाईल अधूनमधून होते. मात्र, भाईगिरी करण्याची जणू सवयच सध्याच्या तरुणांना लागली आहे. उत्तमनगर येथील शाळेत गेलेल्या लहान मुलास गेटबाहेर बोलावून चाकूचा धाक दाखवत त्याच्या दप्तरातील दीडशे रुपये जबरीने हिसकावण्यात आले. तसेच मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुद्धा झाली.
सिडको परिसरात ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते १२.४५ च्या सुमारास जनता विद्यालयाबाहेर ही घटना घडली. फिर्यादीचा मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला असताना काही संशयितांच्या टोळक्याने त्याला गेटबाहेर बोलावले. एका संशयिताने चाकूसारखे धारदार शस्त्र दाखवत मुलाला धमकावले. यानंतर, मुलाच्या दप्तरातील सुमारे १५० रुपये जबरीने काढून घेतले. एवढ्यावरच न थांबता टोळक्याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दहशत निर्माण केली. यापूर्वी असाच प्रकार घडल्याची चर्चा आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Crime: गोंदियाची तरुणी प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशात गेली आणि…; मृतदेह थेट सेप्टिक टँकमध्ये, नेमकं काय घडलं?
अखेर मुलाने घरी झालेली घटना सांगितली. त्यानुसार, विद्यार्थ्याच्या वडीलांनी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत एका १७ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. उर्वरित दोन ते तीन संशयितांचा शोध सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वी सातपूरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये खुन्नस का दिली या वादातून विद्यार्थ्याच्या डोळ्यास गंभीर दुखापत होईपर्यंत मारहाण झाली होती. त्यानंतर आता हा प्रकार उघडकीस आला आहे.
तरुणी प्रियकराला भेटायला भोपाळला गेली
दुसऱ्या एका घटनेत, गोंदिया येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एक तरुणी आपल्या प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशच्या भोपाळला गेली. मात्र, ती घरी परतलीच नाही. एका सेप्टिक टँकमध्ये थेट तिचा मृतदेह सापडला. अशरफी उर्फ सिया (वय ३३ वर्षीय) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा २४ तासात उलगडा केला आहे.