शांतता किती निर्णायक असू शकते याचे जिवंत चित्र मी नुकतेच अहमदाबादला पाहिले. निमित्त होते भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना. भारताच्या डावात रोहित शर्मा बाद झाला आणि मैदानावरील चौकार, षटकारांची आतिशबाजीं थांबली. त्याबरोबरच प्रेक्षकांचा प्रतिसादही थांबला. आवाज बंद झाला. ती भयाण शांतता बोलकी होती. भारतीय क्रिकेटपटूंसाठी असह्य होती. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मात्र त्या शांततेतून एक वेगळीच प्रेरणा मिळत होती. ऑस्ट्रेलियाच्या कप्तान कमिन्सने विजयानंतर तसं बोलूनही दाखवलं. त्या शांततेनेच भारतीय क्रिकेट संघाचा घात केला. तसं पाहायला गेलो तरी सामान्य गोष्ट वाटते. पण वरवर साधी वाटणारी ही गोष्ट भारतीय खेळाडूंसाठी निराशाजनक ठरली. खरंतर त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या भारतीय फलंदाजांना प्रोत्साहित करण्याची गरज होती. ‘चीअरअप’ करण्याची गरज होती. पण क्रीडा संस्कृती किंवा क्रिकेट संस्कृतीपासून फारशी जवळीत नसलेल्या रसिकांना ते कळलेच नाही. नेमके ते कळले ऑस्ट्रेलियन खेळाडूंना. त्यांनी परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतला आणि आपली क्रिकेट युद्धातील सर्व शस्त्रे परिणामकारकरित्या वापरली.
खरंतर स्पर्धेतील सर्व सामने जिंकणाऱ्या भारताला घरच्या मैदानात, अंतिम सामन्यात पराभूत करणे, ऑस्ट्रेलियन संघासाठी सर्वात मोठे आव्हान होते. कारण सव्वा लाखाहून अधिक प्रेक्षक भारतासाठी ओरडत होते, प्रोत्साहन देत होते. ऑस्ट्रेलियासाठी मात्र ओरडणारे प्रेक्षक सव्वाशेदेखील नव्हते. मात्र सलामीलाच भारताकडून पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियाने, या अंतिम सामन्याची पूर्वतयारी, एखाद्या युद्धाप्रमाणे केली होती. कागदावर प्लान ए, प्लान बी, अशा योजना त्यांनी आखल्या होत्या. त्यांनी प्रत्येक भारतीय खेळाडूंचा, अभ्यास करून प्रत्येकासाठी स्वतंत्र योजना आखली होती. प्रत्येक फलंदाज – गोलंदाज यांनी यांची शक्ती स्थाने ओळखून त्यांना कसे रोखायचे याची योजना होती. भारतीय संघाचा सेनापती अर्धशतकाच्या जवळ आला की फटकेबाजीच्या सापळ्यात सापडतो, हे त्यांनी अचूक हेरले होते. म्हणून त्यांनी मॅक्सवेलला नऊ षटकानंतरच गोलंदाजीसाठी पाचारण केले. मॅक्सचा दुसरा चेंडू रोहितने षटकार मारला आणि तिसरा चौकार. तसाच प्रयत्न करणाऱ्या रोहितने त्यानंतर मात्र हेड याच्या हाती झेल दिला. सामन्याच्या कलाटणीचा तो क्षण होता.
श्रेयस अय्यरने त्या षटकात एक चौकार म्हणून खाते उघडले खरे पण त्यानंतरच्या षटकात त्याच्यासाठी लावलेल्या सापळ्यात अडकला. श्रेयस अय्यरची झंजावाती फलंदाजी भारताला उपांत्य सामन्यात विजय मिळवून देण्यात देण्यास कारणीभूत ठरली होती; याचा त्यांनी अभ्यास केला होता. गेल्या दोन सामन्यात ६० चेंडू व ७० चेंडूतील श्रेयसची शतकांची खेळी भारताला विजयाचे लक्ष गाठून देणारी ठरली होती. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने यावेळी श्रेयसवर फोकस ठेवला. कारण कोहली आणि राहुल डावाची बांधणी करताना, वेळ घेतात हे त्यांना ठाऊक होतं. श्रेयसला गोलंदाजी टाकण्यासाठी कमिन्स आला, त्यावेळी त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. त्याच्याकडे आणि ऑस्ट्रेलियन संघाकडे श्रेयससाठी एक प्लान तयार आहे, असंच वाटत होतं. त्याने श्रेयससाठी ३० यार्ड वर्तुळात असलेले क्षेत्ररक्षक आणखी जवळ आणले आणि ऑफ साईडला सीमारेषेवर तीन क्षेत्ररक्षक तैनात केले. श्रेयसला त्यांनी क्रीस पुढे येण्याची संधी दिली नाही. बॅक फुटवर खेळताना उजव्या एसटी वरचा उसळलेला चेंडू त्याला अडचणीत आणणारा ठरतो हे त्यांना ठाऊक होतं. ऑस्ट्रेलियाचा कप्तान यशस्वी ठरला आणि श्रेयस त्यांच्या सापळ्यात अचूक सापडला.
या विकेटमुळे ऑस्ट्रेलियाला आणखी एक बोनस मिळाला होता. तो म्हणजे त्यांनी अकराव्या षटकातच कोहली आणि राहुल ही जोडी मैदानात आणण्यात यश मिळवलं होतं. यंदाच्या विश्वचषकात फॉर्ममध्ये असलेले फलंदाज यानंतर भारताकडे नाहीत याची त्यांना जाणीव होती. कोहली व राहुल डावाची बांधणी करताना संथ खेळणार याचाही अंदाज होता. या परिस्थितीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यामुळेच, अय्यरने मारलेल्या चौकारानंतरचा चौकार तब्बल ९८ चेंडूनंतर आला. या संथ फलंदाजीनेच भारताचा घात केला होता. ऑस्ट्रेलियाने कामचलाऊ फिरकी गोलंदाज मॅक्सवेल, याच्या फिरकी गोलंदाजीचा पुरेपूर वापर करून घेतला. अहमदाबादच्या खेळपट्टीची मोठी सीमारेषा ७९ यार्डवर, तर कमीत कमी सीमारेषा ७१ यार्डची आहे, हे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जाणलं होतं. त्यांच्याकडे चपळ क्षेत्ररक्षक होते. त्यांनी एकेरी धावा रोखल्या आणि दोन धावांच्या जागी एकच धाव दिली. भारतीय खेळाडू मात्र चौकारांच्या प्रतीक्षेत, आणखी वेगात चेंडू फटकावित होते आणि दुहेरी गावाची शक्यता नष्ट करीत होते.
विराट कोहलीसाठी देखील ऑस्ट्रेलियाने अचूक सापळा रचला होता. त्याच्यावर अखेरपर्यंत खेळण्याचे दडपण आहे, हे लक्षात घेऊन त्याच्यासाठी डावपेच आखले. कमिन्सचा चेंडू कोहली द्विधा मन:स्थितीत, उशिरा खेळला. त्यामुळे बॅटला लागून तो चेंडू आत आला आणि स्टंपवर आढळला.
अर्धी लढाई ऑस्ट्रेलियाने तेथेच जिंकली होती. खेळपट्टी अधिक कोरडी असण्याचीही शक्यता होती. त्याचा ऑस्ट्रेलियाने पुरेपूर फायदा घेतला. सूर्यकुमार यादव किंवा राहुल यांना चेंडू स्विप करण्याच्या मोहात पाडताना, त्यांनी चेंडूचा वेग आणखी संथ ठेवला व टप्पा अधिक आखूड केला. या दोघांनाही त्यामुळे नेहमीप्रमाणे आपल्या आवडत्या स्विपच्या फटक्यावर अधिक धावा काढता आल्या नाहीत. खेळपट्टी कोरडी ठेवून गुडलेथवर काही स्पॉट ठेवण्याचा डाव असा भारताच्या अंगलट आला. आपण या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी केली आणि सायंकाळी दुसऱ्या डावात वातावरणात गारवा आल्यानंतर, बॅटवर चेंडू चांगल्या वेगात यायला लागला. दवाबिंदूंमुळेही नंतर ओलसर झालेल्या चेंडूवर कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा या फिरकी गोलंदाजांना चांगली पकड बसवता आली नाही. म्हणजे या आधीच्या दहा सामन्यात जे झालं नाही, ते सर्व अंतिम सामन्यात घडलं. आपले डावपेच आपल्यावरच उलटले. ज्या गोष्टींचा ऑस्ट्रेलियाने आधीच अभ्यास केला असल्याने, त्यांनी अचूक लाभ उठविला.
मुळातच या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ फारशी चांगली कामगिरी करणार नाही, असे सुरुवातीला वाटलं होतं. कारण त्यांच्याकडे संपूर्ण १५ खेळाडूंचा पूर्णपणे फिट असा संचही नव्हता. १५ खेळाडूंनी ते खेळत होते. सलामीचे दोन्ही सामने हरल्यानंतर, या विश्वचषकात त्यांचे काही खरे नाही असे सगळ्यांना वाटत होते. मात्र त्यांनी उशिरा ‘फॉर्म’ पकडला जो अंतिम सामन्याच्या वेळी उपयोगी आला. हेड हा त्यांचा अखेरच्या तिन्ही सामन्यातील सामनावीर. अगदी शेवटी शेवटी तो खेळला. कारण तो पूर्णपणे फिट नव्हता. न्युझीलँडविरुद्ध सामन्यातील शतकाने त्याला आत्मविश्वास दिला. उपांत्य सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संथ आणि खराब खेळपट्टीवर उपयुक्त फलंदाजी केली. गोलंदाजीतही योग्य वेळी विकेट काढून दिल्या. अंतिम सामन्यात त्याने शतक झळकाविले.
ऑस्ट्रेलियाचा कप्तान कमिन्स हा धूर्त कप्तान म्हणून ओळखला जात नाही. मात्र त्याच्यापाठी मॅकडोनाल्ड आणि त्याचे अनुभवी कोचिंग स्टाफ यांचे पाठबळ आहे. क्रिकेटच्या या युद्धात वाररूममध्ये हे अनुभवी लोकच योजना अखित होते. आपणच तयार करून घेतलेल्या खराब खेळपट्टीवर त्यांनी बाजी भारतावर उलटवली. त्यांना अकराव्या षटकातच कोहली आणि राहुल ही भारताची मधली फळी खेळपट्टीवर आणण्यात यश मिळाले होते. त्यानंतर सारं काही ऑस्ट्रेलियासाठीच अनुकूल घडत गेलं. स्टार्क आणि हेजलवूड हे त्यांचे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज, यंदाच्या विश्वचषकात फारसे प्रभावी ठरले नव्हते. मात्र उपांत्य आणि अंतिम सामन्यात त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि संघाला संघाची त्यांच्याकडून असलेली अपेक्षा पूर्ण केली. झंपा हा त्यांचा एकमेव फिरकी गोलंदाज घेऊन या विश्वचषकात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला, मॅक्सवेलच्या फिरकी गोलंदाजीचा भरपूर लाभ झाला. आयपीएल स्पर्धेत भारतातील विविध खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याचा अनुभव असणाऱ्या मॅक्सवेलकडून त्यांनी दहा षटके टाकून घेतली, ती देखील कमी धावांच्या मोबदल्यात. डेव्हिड वॉर्नर हा देखील पूर्ण भरात नव्हता. त्यावेळेस हेड दुखापतीमुळे उशिरा खेळला. स्मितदेखील पूर्णपणे फिट नव्हता. लबुसेनची भारतीय खेळपट्ट्यांवरील कामगिरी फारशी आशादायक नव्हती. अशा परिस्थितीतही त्यांनी अंतिम फेरीपर्यंतचे सर्वच्या सर्व म्हणजे अखेरचे नऊ सामने जिंकले हे कौतुकास्पद आहे. विकेट किपर म्हणून इंग्लिशला खेळवण्याचा त्यांचा जुगारही यशस्वी ठरला.
दहा सामने जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा अंतिम फेरीच्या लढतीत असं का झालं ?
राहुल आणि कोहली मधल्या षटकांमध्ये वेगात धावा पळत नव्हते. त्याबाबत तत्काळ निरोप पाठवून त्यांना सूचित का करण्यात आले नाही? ही गोष्ट कळण्याची कुवत नसेल आणि सांगण्याची हिंमत नसेल तर कोच, मॅनेजर कशाला हवेत. भारतीय संघ जिंकत होता तोपर्यंत त्यांच्या सर्व चुकांकडेही दुर्लक्ष करण्यात येत होतं. संघ निवडीबाबतही चकार शब्द उच्चारला नव्हता. निवृत्तीकडे आलेला अश्विन याला जर अंतिम ११ जणांमध्ये स्थान द्यायचे नव्हते, तर मग पंधरा जणांमध्ये त्याला का घेण्यात आलं ? ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात हेडपासून वॉर्नर आणि अन्य धोकादायक डावखुरे फलंदाज असताना अश्विनला का निवडण्यात आलं नाही?
भारतीय चार संघ सतत जिंकत होता त्यावेळी नाणेफेकीचे अनुकूल कौल आणि सर्वच गोलंदाज आणि फलंदाजांना एकाच वेळी सूर गवसण या गोष्टी निर्णय निश्चित करीत होत्या. सलग दहा विजयानंतर अंकशास्त्राच्या नियमानुसार आपल्याला कुठेतरी फटका बसणार होता, दुर्दैवाने तो अंतिम सामन्यात बसला.
आणखी एका गोष्टीच्या आश्चर्य वाटतं ते म्हणजे १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेटचा संघ संघाचा कप्तान कपिल देव याची इच्छा असताना त्याला आणि त्याच्या संघातील सहकाऱ्यांना अंतिम सामन्यासाठी निमंत्रित केलं गेलं नाही? असं का?
अंतिम फेरीच्या सामन्यात विविध क्षेत्रातील मान्यवर दिसत होते. मात्र क्रिकेटमधील सद्गुरु कपिल देव किंवा महेंद्रसिंग धोनी हे या गर्दीत दिसत नव्हते, असं का ? भारताला याआधी दोन विश्वचषक मिळवून देणाऱ्या क्रिकेट वीरांना जर आमंत्रित केलं जाणार नसेल तर हे ही क्रिकेट संस्कृती मानायची का? एका पराभवामुळे कोणताही संघ दुय्यम ठरत नाही किंवा विजेतेपद मिळाल्यामुळे कोणताही संघ अव्वल होत नसतो.
मात्र तरीही दरम्यानच्या काळातील चुका आणि चुकीचे निर्णय याचा उहापोह होणे गरजेचे आहे. तब्बल ४४ दिवस टॉपवर असणारा भारतीय संघ ४५ वा दिवस खराब आल्यामुळे अपयशी ठरला. मात्र त्यामुळे त्यांच्या संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी गौण ठरवणे उचित ठरणार नाही. झालेल्या चुका वेळीच दुरुस्त केल्या असत्या तर यंदाचे विश्वविजेते आपणच असतो. विश्वचषक २०२३ भारतातच राहिला असता.
– विनायक दळवी