उंब्रज : एकेकाळी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेली काँग्रेस आज कराड दक्षिण पुरती मर्यादित राहिली आहे. जिल्ह्यातील कोरेगाव आणि पाटण या दोन विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेची मजबूत पकड घेतली आहे. तर माण आणि कराड उत्तर शिवसेनेत तुल्यबळ नेते मंडळी असूनसुद्धा स्थानिक निवडणुकीत शिवसैनिकांची घुसमट होत आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना कराड उत्तरेतील शिवसैनिकांची परवड आणि दक्षिणेत माजी मुख्यमंत्री असतानाही उत्तरेतील काँग्रेस अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे सेना व कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या पंखाखालची घुसमट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
राष्ट्रवादीच्या पंखात बळ येण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसचे पंख कापण्याचे षड्यंत्र सुरू असल्याची ओरड कार्यकर्ते करीत आहेत. परंतु नेतेमंडळी आपल्या भल्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात कोणताही कार्यकर्ता मोठा होऊ नये, यासाठी विशेष लक्ष देताना दिसत आहेत. तालुकाध्यक्षपद असो जिल्हाध्यक्षपद ही पदे फक्त नावापुरतीच मर्यादित राहिली आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या तरी नेते टीकाटिप्पणी करण्यात व्यस्त तर कार्यकर्ते कोरोना महामारीचा सामना करण्यात व्यस्त आहेत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार किती दिवस सहन करायचा या विवंचनेत काँग्रेस, शिवसेनेचा कार्यकर्ता अडकला असून राष्ट्रवादीचा वारू मात्र चौफेर उधळू लागला आहे.
सेना व काँग्रेसला जिल्हा बँकेत कोलदांडा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या मदतीने काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला. कराड दक्षिण मधील काँग्रेसचे दिवंगत जेष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अटीतटीच्या लढतीत पराभव केला. तर पाटणमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना माजी बांधकाममंत्री पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता या दोन हाय व्होल्टेज लढतीमुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील वातावरण ढवळून निघाले. जिल्हा बँकेत सोयीस्कर भूमिका घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोलदांडा दिल्याची चर्चा आजही सुरू आहे.
काँग्रेसला अच्छे दिन येणार तर कधी
जिल्ह्यातील काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सध्या कोणीही वाली असल्याचे दिसत नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना स्थानिक निवडणुका आणि स्थानिक नेते मंडळी याच्याबाबत काहीही देणेघेणे नसल्याची चर्चा आहे. एकेकाळी जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व असणारी काँग्रेस एकही जागा जिल्हा बँकेत मिळवू शकली नसल्याने तसेच काँग्रेसच्याच काही पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीने ऐनवेळी गळाला लावल्याने काँग्रेसची ताकत उत्तरोत्तर क्षीण होत चालली आहे. काँग्रेस कार्यकर्तेच खासगीत करत आहेत. एकखांबी तंबू किती दिवस तग धरणार याबाबत चर्चा असून जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत बेरजेच्या राजकारणात किती वजाबाकी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसला अच्छे दिन येणार की वजाबाकीत गळती लागणार याबाबत काँग्रेसचे निष्ठावंत चिंतेत आहेत.
आघाडीतील पेच कायम….
पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांना त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या स्थानिक दिग्गज नेत्यांशी दोन हात करावे लागत आहेत. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खास मार्जितले असून शशिकांत शिंदे सातारा जिल्हयातील साहेबांचे विश्वासू आहेत. यामुळे महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेताना पाटण आणि कोरेगावचा विषय कायमच अडचणींचा ठरत आहेत.