सातारा : राष्ट्रवादीसह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्यावर सातत्याने तोफ डागणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची जिल्हा बँकेच्या संचालक पदावर अर्ज माघारीच्या दिवशी बिनविरोध निवड झाली. दरम्यान, सोसायटी मतदारसंघातून उदयनराजे यांच्या गटातील उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुद्धा जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही राजेंच्या समर्थकांनी साताऱ्यात फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेतले जाणार का ? हा उत्सुकतेचा विषय होता. त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि समर्थकांनी शासकीय विश्रामगृहात तळ दिला होता. तर जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत राजकीय खलबते झाली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून बैठकीत पत्रकारांना राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलची माहिती देत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सहभाग झाल्याचे अंतिम क्षणी जाहीर केले.
खासदार उदयनराजे यांनी गृहनिर्माणमधून अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात रामराजे समर्थक ज्ञानदेव पवार, दिलीप सिंह भोसले, उदयसिंह बरदाडे यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी यांच्यासह अन्य उमेदवारांनी माघार घेतली. तर शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात विनय कडव आणि पांडुरंग देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनीही अर्ज काढून घेतल्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही बिनविरोध निवडून आले. त्यानंतर दोन्ही राजे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.