सातारा – खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी बावधनच्या बगाड यात्रेस (Bavdhan Bagad Yatra) भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जातीजातीत तेढ निर्माण होऊ नये, प्रत्येकाने जबाबदारीने बोलले पाहिजे, तसेच आपली परंपरा टिकण्यासाठी बावधनच्या बगाडाची परंपराही टिकली पहिजे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच राजकीय टिप्पणी देखील केली.
माध्यम प्रतिनिधींनी उमेदवारीबाबत भाजपकडून (BJP) फसवाफसवीचे राजकारण होत नाही ना असा प्रश्न केला यावर उदयनराजे यांनी मिस्कील उत्तर दिले. पुढे उदयनराजे म्हणाले, “फसवाफसवी पिक्चर बघा म्हणजे सगळं कळेल,” असे उदयनराजेंनी स्पष्ट केले. तुम्ही बगाडाकडे काय मागणं घातलं, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘आपण सर्वांनी बंधुभावाने राहिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, तरच या देशाची परंपरा अबाधित राहणार आहे. प्रत्येक जण काहीतरी बोलत असतो. देशाला अखंड ठेवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना अबाधित राहिली पाहिजे. हाताची पाच बोटे एकसारखी नसतात. त्याप्रमाणे प्रत्येकाचे विचारही वेगवेगळे असतात. पक्ष बाजूला ठेवा. प्रत्येकाने जबाबदारीने बोलले पाहिजे. जातीजातीत तेढ निर्माण होऊ नये, म्हणून सर्वांनी जबाबदारीने बोलले पाहिजे, तसेच प्रत्येकाने स्वत:च्या अंत:करणातून बोलले पाहिजे.”असे उदयनराजे म्हणाले आहेत.
ते पवारसाहेब आहेत…
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी तुमची कॉलर उडवायची स्टाइल केली होती. त्यावर उदयनराजेंना विचारले असता ते म्हणाले, ‘‘ते पवार साहेब आहेत.’’ माझी स्टाइल मारली त्याला मी काय करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.