रत्नागिरी: आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून पराभूत करण्याचा संकल्प आम्ही केला असून तो पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा विश्वास राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आमदार साळवी म्हणाले, माझ्यावर स्वतःसाठी झटणारा आमदार अशी टीका करणाऱ्या उदय सामंत यांनी स्वतःचा इतिहास पाहावा. मी गेली ४० वर्षे शिवसैनिक आहे. भविष्यातही पक्षाशी एकनिष्ठच राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आमदार म्हणून राजापूर, लांजा आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना विभागवार बैठका लावण्यासाठी पत्र दिले होते, मात्र पालकमंत्र्यांच्या दबावापोटी त्या घेऊ दिल्या गेल्या नाहीत.
पालकमंत्रीपदाचा गैरवापर
पालकमंत्री म्हणून उदय सामंत जिल्हा नियोजनमधील निधी जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघांवर अन्याय करून फक्त राजापूर विधानसभा मतदारसंघात खिरापतीसारखा वाटत आहेत. श्री. सामंत निवडणुकीवर डोळा ठेवून जिल्हा नियोजनच्या ३०० कोटीच्या निधीपैकी २५० कोटी रुपये फक्त राजापूर मतदारसंघात देत आहेत, यावरून ते पालकमंत्रीपदाचा गैरवापर करत असल्याचे स्पष्ट होते, अशी टीकाही श्री. साळवी यांनी केली.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे श्रेय घेण्यासाठी सामंत बंधूचा आटापिटा
रत्नसिंधु समितीचे सदस्य किरण सामंत यांनी केळवली येथे केलेल्या वक्तव्याचाही श्री. साळवी यांनी चांगलाच समाचार घेतला. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राजापुरात होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याचे पूर्ण श्रेय माझेच आहे. ही बाब किरण सामंत यांच्या लक्षात आल्याने त्यांनी राजकीय नैराश्यातून केळवली येथे माझे स्वीय सहायक हा विषय घेऊन आपल्याकडे आल्याचे विधान केले. मात्र त्यावेळी त्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाचे नाव सांगितले नाही. माझे चार स्वीय सहाय्यक असून माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे श्रेय घेण्यासाठी सामंत बंधू जिवाचा आटापिटा करत आहेत. त्यांनी माझे प्रयत्न नसल्याचे सिद्ध करावे, तसे त्यांनी केल्यास मी राजकीय संन्यास घेण्यास तयार आहे. मात्र त्यांनी ते सिद्ध केले नाही, तर सामंत बंधूंनी राजकीय संन्यास घ्यावा, असे आव्हानही श्री. साळवी यांनी दिले.
अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आमचे अधिकार नाकारायचे, हीच सामंत यांची कृतघ्न खेळी
आगामी निवडणुकीत ते रत्नागिरीतून भाजपाचे उमेदवार असतील, असे सांगत श्री. साळवी म्हणाले, जे उदय सामंत आजपर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे होऊ शकले नाहीत, ते कोणाचेच होऊ शकणार नाहीत. त्यामुळे राजापूरमधील जनतेने गेली पंधरा वर्षे स्वतःसाठी झटणारा आमदार पाहिला. आता जनतेसाठी काम करणारा उमेदवार पाहावा, असे बोलण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. एकीकडे निवडणुकांवर डोळा ठेवून जिल्हा नियोजनाच्या निधीचा खिरापतीसारखा एकाच मतदारसंघात वापर करायचा आणि दुसरीकडे आपल्या पालकमंत्रिपदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आमचे अधिकार नाकारायचे, हीच सामंत यांची कृतघ्न खेळी असल्याची टीका आमदार श्री. साळवी यांनी केली.