लिव्हर डॅमेज करणाऱ्या चुकीच्या सवयी कोणत्या
लिव्हर आपले शरीर विषारी पदार्थांपासून चांगले राखण्यास मदत करते. शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासोबतच लिव्हर आपल्या शरीरामधील रक्त शुद्ध करते आणि शरीराची विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करते. पण, जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही चुका केल्या तर त्या यकृतासाठी धोकादायक ठरू शकतात.
विशेषत: सकाळी केलेल्या वाईट सवयी यकृताला हानी पोहोचवू शकतात आणि यकृत खराब झाल्यास मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढू शकतो. चला जाणून घेऊया अशाच काही चुका, ज्या सुधारल्या नाहीत तर यकृतावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो, याबाबत डाएटिशियन निखिल वत्स यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
सकाळची सुरूवात पाणी पिण्याने
सकाळी उठल्यावर लगेच पाणी प्यावे
सकाळी सर्वात आधी पाणी पिणे फार महत्वाचे आहे. पण अनेक लोक या सवयीकडे दुर्लक्ष करतात, जी यकृतासाठी धोकादायक ठरू शकते. रात्रभर झोपल्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होते आणि सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. पाणी पिण्याने लिव्हरमधील विषारी घटक काढून टाकते आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. दिवसाची सुरुवात पाणी न पिण्याने केल्यास थेट परिणाम लिव्हरच्या आरोग्यावर होतो.
हेदेखील वाचा – Liver Cancer झाल्यास शरीर देतं ‘हे’ संकेत, न ओळखता आल्यास वाढू शकतात समस्या
सकाळीच तळलेले आणि फॅटी पदार्थ खाणे
तळलेल्या पदार्थांचे सकाळीच सेवन करू नये
अनेकांना नाश्त्यात तळलेले किंवा फॅटी पदार्थ खायला आवडतात. तेलकट आणि स्निग्ध पदार्थांच्या सेवनाने पचनसंस्थेलाच हानी पोहोचत नाही तर यकृतावरही परिणाम होतो. चरबीयुक्त पदार्थ लिव्हरमध्ये चरबी जमा करतात, ज्यामुळे फॅटी लिव्हर रोगाचा धोका वाढतो. यामुळे यकृताच्या सामान्य कार्यात व्यत्यय येऊ शकतो आणि दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास मधुमेहासारखे आजार होऊ शकतात.
व्यायाम न करणे
व्यायाम करणे आवश्यक आहे
सकाळी नियमित व्यायाम करणे शरीरासाठीच नाही तर लिव्हरसाठीही फायदेशीर ठरते. व्यायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारून लिव्हरचे कार्यही सुधारते. ज्या लोकांची जीवनशैली बैठी आहे, म्हणजेच जे लोक दिवसभर बसून काम करतात आणि सकाळी व्यायाम करत नाहीत, त्यांच्या यकृतावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यकृत हळूहळू कमकुवत होऊन भविष्यात गंभीर आजार होऊ शकतात.
हेदेखील वाचा – Liver मध्ये कुजलेली घाण स्वच्छ करतील 7 पदार्थ, फॅटी लिव्हरचा धोका होईल कमी
शिळे अन्न खाणे
शिळे अन्न खाणे टाळा
अनेकजण रात्री उरलेलं अन्न सकाळीच खातात आणि त्यांची ही सवय असते. पण ही सवय यकृताला हानी पोहोचवू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? शिळे अन्न यकृतावर अतिरिक्त दबाव टाकते, कारण यकृताला शरीरातील बॅक्टेरिया आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. हे यकृताचे कार्य कमकुवत करू शकते.
सकाळीच धुम्रपान वा दारू पिणे
उठल्यावर धुम्रपान आणि दारू करणे अत्यंत चुकीचे आहे
सकाळी उठल्याबरोबर सिगारेट ओढणे किंवा दारू पिणे यकृतासाठी सर्वात हानिकारक आहे. धूम्रपान आणि अल्कोहोल यकृताच्या पेशींचे नुकसान करतात, ज्यामुळे लिव्हरचे कार्य बिघडू शकते. हे वेळीच थांबवले नाही तर लिव्हर सिरोसिस किंवा कॅन्सरचा धोका असू शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.