
तुम्हीही पेपर कपमध्ये चहा पिता का? आरोग्यासाठी ठरते घातक; कारण...
थंडीचा हंगाम सुरू झाला की टपऱ्यांवर चहा पिणाऱ्यांची गर्दी वाढते. पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रत्येक चौकात, कार्यालयाबाहेर आणि रस्त्याच्या कडेला पेपर कपमधूनच चहा विकला जातो. सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, बँका – सगळीकडे पेपर कपचा वापर सर्वसामान्य झाला आहे. सोय आणि स्वच्छता यासाठी हा पर्याय सोपा वाटत असला तरी त्याची किंमत आरोग्याने चुकवावी लागत आहे.
संशोधनानुसार, पेपर कपवर पॉलिथिलीनचा एक पातळ थर दिलेला असतो. हा थर कपाला ओलावा येऊ नये म्हणून वापरला जातो. मात्र, जेव्हा गरम चहा किंवा कॉफी त्यात ओतली जाते, तेव्हा हा थर वितळू लागतो. परिणामी सूक्ष्म प्लास्टिक आणि रासायनिक घटक पेयात मिसळतात. हे घटक शरीरात गेल्यावर हार्मोनल असंतुलन, पचन संस्थेचे विकार, यकृताचे नुकसान आणि दीर्घकाळात कर्करोगाचा धोका निर्माण होतो.
राज्यातील बुलडाणा, इचलकरंजी, अमरावती आदी ठिकाणी पेपर आणि प्लास्टिक कपच्या वापरावर प्रशासनाने आधीच बंदी घातली आहे. आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवडमध्येही अशाच बंदीची मागणी होत आहे.
आरोग्यासाठी धोक्याची घंटा
शहरातील टपऱ्या, हातगाड्या, बसस्थानके, रेल्वे स्टेशन, तसेच एमआयडीसी कॅन्टीनमध्ये चहा विक्रेत्यांकडून काचेचा ग्लास धुण्याचा त्रास टाळण्यासाठी कागदी कपांचा मोठ्या प्रमाणात वापरतात. हे कप बाहेरून स्वच्छ आणि हलके वाटतात मात्र गरम पेय ओतल्यावर कागदावरील प्लास्टिकचा थर वितळून रासायनिक घटक चहात मिसळण्याचा धोका असतो. पार्सलसाठी प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये गरम चहा देण्याची प्रथा वाढली आहे. अशा पिशवीत गरम चहा ओतल्यास प्लास्टिकमधील हानिकारक रसायने चहात मिसळू शकतात, ज्यामुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोका संभवतो.
‘केमिकल कप’चे दुष्परिणाम
बुलडाणा, इचलकरंजी, अमरावती येथे बंदी लागू, प्लास्टिक व पेपर कपऐवजी पुनर्वापर करता येणारे कप वापरण्याचे आवाहन, पिंपरी-चिंचवडमध्ये निर्णयाची उत्सुकता…
सध्या, प्लास्टिक किंवा कागदी कपचा कर्करोगाशी संबंध असल्याचे कोणतेही निश्चित पुरावे नाहीत. तथापि, सामान्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून भांडीसाठी पारंपारिक साहित्य वापरण्याची शिफारस नेहमीच केली जाते. – डॉ. चकोर व्होरा, वैद्यकीय कर्करोग तज्ज्ञ.
कप बदलण्याची वेळ आलीय!
चहा हा रोजचा साथीदार असला, तरी त्याचा कप आपल्याला आजारी पाडतोय. आता सवय बदलण्याची आणि पर्यावरणासोबतच आपल्या आरोग्याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.
वापरून टाकलेले प्लास्टिक कप कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवतात. प्लास्टिक कप जाळल्यास विषारी वायू उत्सर्जित होतात आणि खुले टाकल्यास माती व पाण्यात सूक्ष्म प्लास्टिक तयार होऊन पर्यावरण प्रदूषित होते. याशिवाय, त्याच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी व ऊर्जा खर्च होत असल्याने कार्बन उत्सर्जनही वाढते. – सागर वाघ, निसर्गराजा मित्र जिवांचे.