फोटो सौजन्य - Social Media
ब्रेन स्ट्रोक, ज्याला मेंदूचा झटका असेही म्हटले जाते, ही एक अतिशय गंभीर आणि जीवघेणी स्थिती असते. यामध्ये मेंदूमध्ये रक्तपुरवठा अचानक थांबतो किंवा कमी होतो, ज्यामुळे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही. यामुळे काही मिनिटांतच मेंदूच्या पेशी मरू शकतात. परंतु अशा प्रसंगांपूर्वी शरीर काही महत्त्वाचे संकेत देत असते. हे संकेत ओळखून वेळीच डॉक्टरांकडे धाव घेतल्यास स्ट्रोक टाळता येऊ शकतो किंवा त्याचा परिणाम कमी होऊ शकतो.
ब्रेन स्ट्रोक येण्याआधी सर्वात सामान्य लक्षण म्हणजे अचानक होणारी अंगाच्या एका बाजूची कमजोरी किंवा असंवेदनशीलता. जर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर, हातावर किंवा पायावर अचानकपणे कमजोरी जाणवू लागली, तर ती एक गंभीर सूचना असू शकते. यासोबतच बोलण्यात अडचण होणे, अस्पष्ट बोलणे, शब्द विसरणे हे देखील ब्रेन स्ट्रोकचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
दृष्टी अचानक कमजोर होणे किंवा डोळ्यासमोर धुंध दिसणे हे देखील महत्त्वाचे लक्षण आहे. काही लोकांना डोळ्यांपैकी एका डोळ्याने बघण्यात अडचण निर्माण होते. याशिवाय अचानक प्रचंड डोकेदुखी होणे, जी पूर्वी कधीच अनुभवली नसेल, हे देखील स्ट्रोकचे लक्षण असू शकते. चालण्यात असंतुलन, अचानक चक्कर येणे, चालताना तोल जाणे किंवा समन्वय हरवणे हीदेखील लक्षणे शरीर देत असते. काही वेळा लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि ते सामान्य थकवा समजतात, पण ही चूक जीवावर बेतू शकते.
अशा कोणत्याही लक्षणांची जाणीव होताच त्वरित वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे. ‘FAST’ ही चाचणी पद्धत लक्षात ठेवावी – Face (चेहरा वाकडे होणे), Arms (हात उचलता न येणे), Speech (बोलण्यात अडचण), आणि Time (वेळेवर उपचार घेणे). स्ट्रोकची शक्यता असताना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल होणे अत्यंत आवश्यक असते. वेळीच उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात आणि कायमस्वरूपी अपंगत्वापासून बचाव होतो. त्यामुळे शरीर दिलेले संकेत ओळखा आणि डॉक्टरांची मदत घ्या कारण काही मिनिटांची दिरंगाईही धोका निर्माण करू शकते.