फोटो सौजन्य - Social Media
इन्सेफलायटिस हा एक गंभीर आजार आहे जो अचानक मेंदूवर हल्ला करू शकतो आणि माणसाला कोमामध्ये पाठवू शकतो. हा आजार इतका धोकादायक आहे की त्यापासून वाचण्यासाठी सावधगिरी आणि योग्य वेळी उपचार घेणे आवश्यक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इन्सेफलायटिस इंटरनॅशनल यांच्या ताज्या अहवालानुसार, हा आजार संपूर्ण जगासाठी गंभीर आरोग्य समस्या बनत आहे. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो आणि त्यामध्ये मेंदूला सूज येते, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, बोलताना त्रास होणे आणि मानसिक विकार यांसारखे अनेक परिणाम दिसून येतात.
इन्सेफलायटिस हा प्रामुख्याने दोन प्रकारचा असतो. संक्रामक इन्सेफलायटिस तेव्हा होतो, जेव्हा विषाणू, जिवाणू किंवा परजीवी मेंदूवर हल्ला करतात. भारतात जपानी इन्सेफलायटिस आणि स्क्रब टायफस हे याचे प्रमुख कारणे आहेत. दुसरा प्रकार म्हणजे ऑटोइम्यून इन्सेफलायटिस, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली चुकून स्वतःच्या मेंदूवर हल्ला करते. हा रोग वेगाने पसरतो आणि वेळीच उपचार न केल्यास कोमामध्ये जाण्याची किंवा मृत्यूची शक्यता असते. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांसाठी हा आजार अधिक घातक ठरतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.
2024 च्या आकडेवारीनुसार, देशभरातील 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1,548 जपानी इन्सेफलायटिसचे रुग्ण आढळले. उन्हाळा आणि पावसाळ्यात या आजाराचे प्रमाण जास्त वाढते. इन्सेफलायटिस इंटरनॅशनलच्या प्रमुख डॉ. एवा ईस्टन यांनी सांगितले की, जर वेळीच या आजाराकडे लक्ष दिले नाही, तर पुढील काही वर्षांत मृत्यू आणि अपंगत्वाच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आणि तज्ज्ञांनी सरकार, डॉक्टर्स आणि संशोधकांना यावर गांभीर्याने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
या आजारापासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. लसीकरण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण जपानी इन्सेफलायटिस यांसारख्या आजारांपासून बचावासाठी लस उपलब्ध आहे. पावसाळ्यात मच्छरदाणी आणि रिपेलेंट चा वापर करून मच्छरांचा प्रादुर्भाव रोखला पाहिजे. दूषित अन्न आणि पाणी टाळले पाहिजे, कारण यामुळे संक्रमण होऊ शकते. ताप, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा किंवा संभ्रम यांसारखी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. वेळीच खबरदारी घेतली आणि योग्य उपचार घेतले तर इन्सेफलायटिसचा धोका टाळता येऊ शकतो.