घरगुती गणेशाच्या सजावटीमध्ये बऱ्यापैकी चीनमधून येणाऱ्या साहित्याचा वापर व्हायचा. पण, लॉकडाउनमुळे सारे जगच ठप्प झाल्यानंतर पुन्हा स्थानिक सजावटीच्या वस्तूंकडे लोक वळले. याच परिस्थितीत कापडी कोल्हापुरी फेट्यांची संकल्पना पुढे आली आणि या फेट्यांना बघता बघता गेल्या वर्षापासून मागणी वाढली. यंदा तर गेल्या महिन्यापासून या फेट्यांसाठी आगाऊ नोंदणी सुरू झाली असून, त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जावू लागला आहे.
गेल्या काही वर्षात घरगुती बाप्पांच्या सजावटीत फेटे आणि पितांबराला मोठी मागणी वाढली. मात्र, फेट्यांमध्ये प्लास्टिकच्या फेट्यांची रेंज उपलब्ध असायची. लॉकडाउनच्या काळात कापडी फेट्यांची व्हरायटी उपलब्ध झाली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. स्थानिक बाजारपेठेत या फेट्यांना मोठी मागणी राहिली. यंदा तर केवळ कोल्हापूरच नव्हे तर जगभरात कुठेही फेटे उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. कापडाच्या क्वालिटीनुसार पाचशे रूपयांपासून ते एक हजार रूपयांपर्यंतच्या रेंजचे फेटे यंदा उपलब्ध होणार असून, पुणे, मुंबई, गोवा आणि कर्नाटकातूनही त्यासाठी आगाऊ नोंदणी झाली आहे.
घरगुती मूर्ती लहान असल्याने त्याच्या आकारानुसार फेट्यांसाठी माप घ्यावे लागते. ते बिनचूक असेल तरच मूर्तीवर फेटाही योग्य पद्धतीने शोभून दिसतो. गणेशमूर्तींच्या फेट्यासाठी राजमान्य कोल्हापुरी फेटे या नावाने आम्ही फेटे उपलब्ध करून देत आहोत. सध्या महाराष्ट्राबरोबरच गोवा आणि कर्नाटकातूनही मागणी वाढली असून, जगभरात कुठेही फेटे पाठवायचे असतील तर सोपे जावे, यासाठी ॲडजस्टेबल फेटेही तयार केले आहेत.