Friendship Day 2025 : शाळेपासून कॉलेजपर्यंत मुलींच्या मैत्रीमध्ये होणारे बदल...
Happy International Friendship Day 2025 : मुलींची मैत्री ही फारशी हळवी, भावनिक आणि अनेकदा खोल असते. शाळेपासून सुरू झालेली ही नात्यांची वीण वेळेनुसार बदलत जाते. प्रत्येक टप्प्यावर मैत्रीचं स्वरूप, कारणं आणि त्यामागची भावना बदलत जाते. शाळेतील मैत्री म्हणजे निरागसतेचा आनंद. एकत्र टिफिन खाणं, होमवर्क कॉपी करणं, पेन-वाढदिवसाचं गिफ्ट देणं आणि चिठ्ठ्यांमधून संवाद साधणं… या सगळ्या गोष्टींमधून मुलींची जवळीक वाढते. शाळेतील मैत्रिणी ही अनेकदा ‘सर्वोत्तम मैत्रिणी’ असतात. त्यांच्याशी वाटलेलं सगळं शेअर केलं जातं. या टप्प्यावर स्पर्धा कमी आणि सहकार्य अधिक असतं.
मात्र, जसजसं कॉलेजचं दार उघडतं, तसतशी मैत्रीचं रूप थोडंसं बदलतं. कॉलेज म्हणजे स्वातंत्र्य, नव्या ओळखी आणि स्वत्व शोधण्याचा काळ. त्यामुळे जुन्या मैत्रिणींपासून काहीसं अंतर निर्माण होऊ शकतं. नव्या मैत्री निर्माण होतात, परंतु त्यामध्ये अनेकदा थोडीशी तुलना, ईर्षा किंवा वेळेअभावी दुरावा जाणवू शकतो. कॉलेजमध्ये करिअर, रिलेशनशिप्स आणि वैयक्तिक आवडीनिवडी यामुळे मैत्रीला वेळ देणं थोडं कठीण होऊ लागतं. काही मैत्रिणी दूर जातात, तर काही अजून घट्ट होतात. मैत्रीचे मोल यातून अधिक उमगते. शाळेतील निरागस मैत्री आता परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करते.
या बदलांचा अर्थ असा नाही की मैत्री संपते, तर ती काळानुसार वेगळ्या रूपात दिसू लागते. काही वेळा जुन्या मैत्रिणींशी वर्षानुवर्षे संपर्क नसला, तरी एक फोन कॉल, एक भेट पुन्हा तीच जुनी ऊब निर्माण करू शकते. शाळेपासून कॉलेजपर्यंत मुलींच्या मैत्रीत होणारे हे बदल नैसर्गिक असतात. जीवनाच्या प्रवाहात बदल हा अपरिहार्य आहे, पण खरी मैत्री ही या सर्व बदलांना तोंड देत टिकून राहते. मैत्री ही फुलासारखी असते, ती जशी काळानुसार उमलते, तशीच काळानुसार नवी रूपं धारण करते. शेवटी एवढंच म्हणता येईल, बदल होतात, पण मनातली जागा जर खरी असेल तर ती मैत्री कायमची राहते.
मैत्री दिन कधी साजरा केला जाणार आहे?
३ ऑगस्ट
फ्रेंडशिप डे कसा साजरा केला जातो?
आपल्या मित्रांना भेटवस्तू किंवा फ्रेंडशिप बँड बांधून, मित्रांसोबत वेळ घालवून किंवा त्यांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा केला जाऊ शकतो
मैत्री दिनाचे महत्त्व काय?
मैत्रीच्या नात्याला समर्पित हा दिवस मित्रांच्या सहवासाचा आपल्या जीवनात किती फरक पडतो, जीवनातील मित्रांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.