फोटो सौजन्य - Social Media
पेणच्या ‘हिडन गाव व्हिला’ मध्ये रात्रीच्या सुमारास रजनीश झगडे आणि त्यांचे कुटुंबीय हळदीच्या कार्यक्रमाकरिता गेले होते. मुळात, हळद त्यांचीच लेक अवंतिकाची असते. घरातल्या घरातील मंडळींमध्ये ही हळद हुरकण्याचा विचार असतो. हळदीत फार काही पाहुणे नसतात. घरातली आणि काही बाहेरील आप्तेष्ट मंडळी या कार्यक्रमाला हजेरी लावणार असतात. संध्याकाळी ७ च्या सुमारास सगळेजण ‘हिडन गाव व्हिला’ येथे येऊन पोहचतात. हळदीची सगळी तयारी होते. अत्यंत जोरात हळदी कार्यक्रम संपन्न होते.
रात्रीचे साडे ११ वाजून गेले असतात. सगळीजणं त्यांच्या त्यांच्या रूममध्ये जातात. व्हिलामध्ये रजनीश आणि त्यांची पत्नी, मुलगा आणि अवंतिका हे चौघेच असतात. बाकी आत्पेष्ट मंडळी दूरवर काही लॉजेस असतात तिथे जाऊन राहतात. लॉजेस आणि व्हिलाच्या दरम्यान रानातून फार मोठी पायवाट असते. त्या काटे-दगडांना बाजूला सारत मंडळीही त्यांच्या लॉजेसवर पोहचतात. थरार सुरु होतो, तो व्हिलामध्ये! 3BHK असणारा त्या व्हिलामध्ये एका रूमात रजनीश आणि त्यांची पत्नी झोपते. तर बाकी दोन रूममध्ये (वरच्या मजल्यावर) दोन्ही मुले जातात.
रात्रीचे ३ वाजलेले असते. रजनीश यांच्या कानावर कॅरमच्या सोंगट्यांचा आवाज येत असतो. कॅरम बाहेर हॉलच्या केंद्रभागी ठेवलेले असते. “इतक्या रात्री कोण बरं कॅरम खेळतंय?” असा प्रश्न रजनीश यांना येतो पण ते झोपून राहतात. हळुवार हा आवाज फार कर्कश होत जातो. रजनीश उठून रूमचा दार उघडतात. त्या काळोखात पाहण्यापुरता प्रकाश असतो. रजनीश पाहतो तर काय? कॅरमवर कुणी नसतं. सोंगट्याही जागेवर स्तब्ध असतात. रजनीश झोपेत असल्यामुळे त्याला वाटते की त्याला भास झाला असेल. रूमच्या समोरच वॉशरूम असते, तो तिथे जातो. जसा आत जातो, तसा त्याला पुन्हा कुणी तरी कॅरम खेळत असण्याचा भास होतो.
रजनीश वॉशरूम बाहेर येतो आणि पाहतो तर काय? कॅरमवर कुणी नाही. पण सोंगट्यांची स्थिती बदलेली असते. सोंगट्या जागेवरून हळल्या असतात आणि एक सोंगटी तर खाली पडलेली असते. रजनीश हॉलमध्ये जातो. ती सोंगटी उचलून वर ठेवतो. तो प्रश्नात पडलेला असतो. त्याला ठाऊक असते त्याच्यासोबत काय घडतंय? पण तो आक्रोश करण्याचे धाडस करत नाही. शांत येऊन तो रूममध्ये पडतो. आता कॅरमचा आवाज बंद झालेला असतो. इतक्यात त्याची नजर खिडकीवर जाते. खिडकीवर त्याला एक काळी आकृती दिसते, जी लगेच गायबदेखील होते. रजनीश घाबरून बायकोला उठवतो. तिला हे सगळ्या गोष्टी सांगतो, पण बायको झोपेत असते, ती त्याच्या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करून झोपायला सांगते.
रजनीश उठून खिडकीकडे जातो तितक्यात मागून पुन्हा तो कॅरमचा आवाज येतो. रजनीश घाबरून वेडा झाला असतो. ती सावली, त्याला पुन्हा पुन्हा जाणवत असते. रजनीश पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतो पण रात्रभर हा थरार सुरु असतो. सकाळचा कोंबडा आरवताच, सगळे जागे होतात. पण हा थरार फक्त त्याच्याचसोबत झालेला असतो. भयंकर म्हणजे कॅरमच्या सगळ्या सोंगट्या सकाळी खाली पडलेल्या असतात. लग्न हुरकून रजनीश रात्र होण्याच्या अगोदर त्याच्या परिवारासहित तो व्हिला सोडतो.