फोटो सौजन्य - Social Media
आजकाल मोबाईलवरील रील्स पाहणे ही एक मोठी सवय बनली आहे. अवघ्या १-२ मिनिटांचे शॉर्ट व्हिडीओ पाहता पाहता तासच्या तास कसे निघून जातात, हे कळतही नाही. याचा मोठा परिणाम आरोग्यावर होतो. रील्सचे व्यसन मेंदूच्या क्षमतेवर परिणाम करून तणाव आणि मानसिक समस्यांनाही आमंत्रण देते. फक्त तरुणच नव्हे, तर लहान मुले आणि वयस्कर लोकही मोठ्या प्रमाणात रील्स पाहण्यात वेळ वाया घालवत आहेत. ‘रेडसीर स्ट्रॅटेजी’च्या अहवालानुसार, भारतातील प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्ता सरासरी २.५ तास स्क्रीन स्क्रोल करण्यात घालवतो, त्यातील ४० मिनिटे फक्त रील्स पाहण्यात जातात. ज्या लोकांना रील्सचे व्यसन आहे, त्यांचा हा वेळ ५-६ तासांपर्यंत वाढतो.
रील्सच्या व्यसनामुळे अनेक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त वेळ रील्स पाहिल्याने चिडचिड वाढते, झोप आणि भूक यावर परिणाम होतो. आत्मविश्वास कमी होतो आणि राग पटकन येतो. सतत स्क्रीनकडे बघितल्यामुळे तणाव आणि नैराश्य वाढते, तसेच विचार करण्याची क्षमता कमी होते. काही वेळा खरी दुनिया कंटाळवाणी वाटू लागते आणि रील लाइफच खरी वाटू लागते. पालकांशी आणि मित्रांशी नातेसंबंध बिघडतात, संवाद कमी होतो. जास्त वेळ स्क्रीन वापरल्याने हात आणि मान विचित्र प्रकारे हालण्याचा त्रास सुरू होतो. काही लोक तर काल्पनिक लोकांशी बोलताना दिसतात.
याशिवाय, शाळा-कॉलेजला जायची इच्छा राहत नाही आणि मैदानी खेळ सोडून फोनवर वेळ घालवला जातो. मानसिक आणि भावनिक विकासावर परिणाम होतो, तसेच लहान मुले वयाच्या मानाने मोठ्यांसारखे वागू लागतात. काही वेळा आक्षेपार्ह भाषा आणि वर्तन वाढते. सतत रील्स पाहण्याने मुलांचा लक्ष केंद्रीकरणाचा काळ मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि ते विसराळू होतात. काही प्रकरणांमध्ये, नैराश्य इतके वाढते की आत्महत्येचा विचारही मनात येतो.
हे व्यसन सोडण्यासाठी काही उपाय गरजेचे आहेत. काम करताना, मिटिंगमध्ये किंवा गाडी चालवताना फोनचा डेटा बंद ठेवावा. कुटुंब व मित्रांसोबत असताना फोन बाजूला ठेवावा. झोपताना फोन उशाजवळ न ठेवता थोड्या अंतरावर ठेवावा. सेटिंग्जमध्ये जाऊन सोशल मीडिया नोटिफिकेशन्स बंद करावीत. मोबाईलऐवजी लॅपटॉप किंवा संगणकावरच सोशल मीडिया वापरण्याची सवय लावावी. रील्स पाहण्यासाठी एक ठराविक वेळ निश्चित करावा आणि त्यापलीकडे पाहू नये. व्यसनापासून वाचण्यासाठी खेळ, वाचन, संगीत किंवा इतर छंद जोपासावेत. जर स्वतःच्या प्रयत्नांनंतरही व्यसन सुटत नसेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
रील्स बघण्याचा थोडा विरंगुळा ठीक असतो, पण त्याचे व्यसन मानसिक आणि शारीरिक नुकसान करू शकते. त्यामुळे वेळेवर योग्य निर्णय घ्या आणि डिजिटल डिटॉक्स करून स्वतःचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा!