
फोटो सौजन्य - Social Media
नात्याला वेळ जास्त झालेला असो वा कमी शेवट नेहमीच वेदनादायक असतो. जेव्हा दोन लोक नात्यात येतात, तेव्हा फक्त प्रेमच नाही तर काळजी, समजूतदारपणा आणि मतभेदही आलेले असतात. काहीवेळा मोठ्या कारणांमुळे ब्रेकअप होतो, तर कधी अगदी किरकोळ गोष्टींमुळेही नाते तुटते. यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे नात्यात ब्रेक घेण्याचा निर्णय. अनेकदा जोडपे एकमेकांपासून काही काळासाठी दूर राहण्याचा निर्णय घेतात. यामागे वेगवेगळे कारणे असतात – नात्यातील तणाव कमी करणे, स्वतःला वेळ देणे किंवा नात्याची दिशा समजून घेणे. हे एक प्रकारचे ‘रीफ्रेशिंग पॉज’ असते, पण योग्य व्यवस्थापन नसेल तर हेच ब्रेक नात्याच्या समाप्तीचे कारण बनू शकते.
ब्रेक घेण्याचे काही फायदे असतात. यामुळे नात्यातला कंटाळा दूर होतो आणि नवा दृष्टीकोन मिळतो. शांतपणे विचार करण्याची संधी मिळते आणि नात्याची सीमा व अपेक्षा स्पष्ट होतात. तसेच, हे नाते अधिक सशक्त करण्यासाठी उपयोगी पडते. काहीवेळा, अशा ब्रेकमुळे ब्रेकअप होण्याची शक्यता कमी होते, कारण दोघांनाही आपल्या भावनांचा आणि नात्याचा योग्य अंदाज येतो. मात्र, ब्रेक घेताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर याचा उलट परिणाम होऊ शकतो.
ब्रेकनंतर नाते पुन्हा सुरळीत करणे किती सोपे असेल, हे दोघांच्या संवादावर आणि परस्पर समजुतीवर अवलंबून असते. ब्रेक घेण्याआधीच त्याची गरज आणि उद्देश स्पष्ट असायला हवा. रिलेशनशिप तज्ञ सांगतात की, ब्रेक घेताना त्याची कालमर्यादा आणि उद्देश निश्चित करणे गरजेचे आहे, जेणेकरून पुढील संभ्रम टाळता येईल. ब्रेक घेण्याचा निर्णय जर योग्य नियोजनाशिवाय घेतला तर तो शेवटी ब्रेकअपमध्ये बदलू शकतो.
ब्रेकनंतर ब्रेकअप टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दोघांमध्ये संवाद राहिला पाहिजे. एकमेकांच्या भावनांचा आदर करावा आणि ओव्हरपझेसिव्ह किंवा कंट्रोलिंग होण्याचे टाळावे. ब्रेक दरम्यान विश्वास टिकवणे गरजेचे आहे, तसेच नात्यातील छोटे वाद दुर्लक्ष करणे अधिक चांगले असते. प्रेम व्यक्त करणे विसरू नये आणि अहंकार नात्यावर हावी होऊ देऊ नये. नात्यात नवा उत्साह राहील याकडेही लक्ष द्यावे. वैयक्तिक किंवा व्यावसायिक तणाव नात्यावर परिणाम करू नये. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ब्रेक कधी संपवायचा आणि त्यानंतर नाते कसे सुधारायचे याचे स्पष्ट नियोजन असले पाहिजे. यामुळे नाते अधिक दृढ होण्यास मदत होते आणि ब्रेक खऱ्या अर्थाने नात्यासाठी फायद्याचा ठरतो.