फोटो सौजन्य - Social Media
आपली त्वचा ही शरीराची पहिली आणि महत्वाची संरक्षण कवच असते. बाहेरील वातावरणातील धूळ, घाण, प्रदूषण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांपासून ही त्वचा सतत त्रस्त असते. सूर्याच्या या किरणांचा त्वचेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या, डाग, लवकर वृद्धत्वाचे लक्षणे, त्वचेचा रंग असमान होणे, इत्यादी त्रास उद्भवतात. यापैकी सर्वात गंभीर परिणाम म्हणजे त्वचा कर्करोगाचा धोका. ही सगळी संकटं टाळण्यासाठी सनस्क्रीनचा नियमित आणि योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
अनेक लोकांचा गैरसमज असतो की सकाळी एकदाच सनस्क्रीन लावल्यावर दिवसभरासाठी ते पुरेसे असते. मात्र, ही धारणा चुकीची आहे. त्वचारोग तज्ज्ञ सांगतात की जर तुम्ही दिवसभर बाहेर राहत असाल, तर सनस्क्रीन दर 2 ते 3 तासांनी पुन्हा लावणे गरजेचे आहे. विशेषतः जर तुम्हाला खूप घाम येत असेल किंवा तुम्ही पाण्यात गेलात (जसे की पोहणे किंवा व्यायाम करताना), तर सनस्क्रीन त्वचेवरून निघून जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत वारंवार लावणे आवश्यक ठरते.
सनस्क्रीन लावण्याची योग्य वेळ म्हणजे घरातून बाहेर पडण्याच्या किमान 15-20 मिनिटे आधी. त्यामुळे त्वचेवर त्याचा परिणाम नीट होतो आणि सूर्यप्रकाशात गेल्यावर त्वचेला त्वरित संरक्षण मिळते. तसेच, दिवसभर तुम्ही बाहेर असल्यास, दर काही तासांनी ते पुन्हा लावणे विसरू नका. जर तुम्ही पाण्यात गेलात किंवा घाम खूप आला, तर त्वचा कोरडी करून लगेच नवीन थर लावावा. सनस्क्रीन योग्य पद्धतीने न लावल्यास अनेक त्वचासंबंधी समस्या उद्भवू शकतात. UV किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या, डाग, आणि वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसू लागतात. याशिवाय, या किरणांमुळे त्वचेतील पेशींच्या DNA मध्ये नुकसान होऊन त्वचा कर्करोगाचा धोका वाढतो. दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्वचेला जळजळ, सूज, एलर्जी, लालसरपणा अशी त्रासदायक लक्षणे दिसू शकतात. सूर्यप्रकाशामुळे त्वचेतल्या मेलानिनवर परिणाम होऊन त्वचेचा रंग असमान होतो आणि त्वचा काळसर, पांढऱ्या ठिपक्यांनी भरलेली दिसू शकते.
योग्य सनस्क्रीन निवडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नेहमी SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेला सनस्क्रीन वापरावा. तसेच, ‘ब्रॉड स्पेक्ट्रम’ असलेला सनस्क्रीन निवडा, जो UVA आणि UVB दोन्ही प्रकारच्या किरणांपासून संरक्षण देतो. प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असल्यामुळे त्यानुसार सनस्क्रीनची निवड करावी. जर त्वचा ऑयली असेल तर ऑयल-फ्री फॉर्म्युला असलेले सनस्क्रीन वापरावे. ड्राय स्किनसाठी हायड्रेटिंग किंवा मॉइश्चरायझिंग घटक असलेले सनस्क्रीन योग्य ठरते.
शेवटी, त्वचेसाठी हानीकारक केमिकल्सपासून मुक्त, डर्मटोलॉजिस्ट टेस्टेड आणि त्वचेला सुरक्षित असलेले प्रोडक्ट निवडणे आवश्यक आहे. सनस्क्रीनचा नियमित वापर हा केवळ त्वचेचे सौंदर्य टिकवण्यासाठीच नव्हे तर दीर्घकालीन आरोग्यासाठीही अत्यावश्यक आहे. त्यामुळे सूर्यप्रकाशात बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे ही एक आवश्यक सवय म्हणून अंगीकारा.