फोटो सौजन्य - Social Media
वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करत असतात. काहीजण नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणे पसंत करतात, तर काहीजण वेगाने वजन कमी करण्यासाठी औषधे किंवा इंजेक्शनचा आधार घेतात. पण खरंच, या गोळ्या किंवा इंजेक्शनमुळे वजन कमी होऊ शकते का? याचे फायदे आणि तोटे काय आहेत? चला जाणून घेऊया.
सध्या बाजारात अशा काही इंजेक्शन उपलब्ध आहेत, जे वजन कमी करण्यासाठी वापरले जातात. हे इंजेक्शन मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतात आणि शरीरातील चरबीच्या शोषणावर परिणाम करतात. हे इंजेक्शन मेंदूतील त्या भागावर काम करतात जे भूक नियंत्रित करतात. त्यामुळे व्यक्तीला पोट भरल्यासारखे वाटते आणि खाण्याची इच्छा कमी होते. परिणामी, कॅलोरी इनटेक कमी होतो आणि वजन कमी होऊ लागते.
वजन कमी करणाऱ्या काही गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत. या गोळ्या शरीरातील फॅटचे शोषण २५-३०% पर्यंत कमी करतात. या गोळ्यांमुळे शोषित न झालेली चरबी मलाद्वारे शरीराबाहेर टाकली जाते, ज्यामुळे शरीरात कॅलोरीचे प्रमाण कमी राहते. या औषधांचा आणि इंजेक्शनचा वापर करताना काही दुष्परिणाम देखील जाणवू शकतात. यामध्ये मळमळ, उलटी, पोटदुखी, डोकेदुखी, झोपेची कमतरता, चिडचिड, पचनातील अडचणी अशा त्रासांचा समावेश होतो. तसेच, यांचा दीर्घकाळ वापर केल्यास पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे वापरणे टाळावे.
वजन कमी करण्यासाठी औषधे किंवा इंजेक्शन काही प्रमाणात मदत करू शकतात, पण याशिवाय आपल्या दिनचर्येत बदल करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली ही वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. गोळ्या आणि इंजेक्शन वजन कमी करण्यात मदत करू शकतात, पण त्यांचा उपयोग केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. तात्पुरता परिणाम नको असेल आणि आरोग्य टिकवायचे असेल, तर नैसर्गिक मार्गच अधिक सुरक्षित आणि शाश्वत ठरतो.