मिठाईचा हृदयावर होणारा परिणाम (फोटो सौजन्य - iStock)
सणासुदीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे गोडधोडाच्या पदार्थांचे खाणे होते. परंतु यामुळे हृदयावर ताण देखील येऊ शकतो. सणांच्या दरम्यान काय खावे आणि आहारातून काय वगळावे याचा सल्ला या लेखाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. हृदय सुरक्षित आणि निरोगी ठेवणे ही काळाची गरज आहे. म्हणून खाली दिलेल्या महत्त्वाच्या टिप्सचे पालन करावे. यामुळे तुम्ही तुमच्या हृदयाची योग्य काळजी घेऊ शकता. डॉ. गौरव सुराणा, कार्डिओलॉजिस्ट,न्यूईरा हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे
सण साजरा करण्यासाठी कुटुंबीय आणि मित्र परिवार एकत्र येतात. या दरम्यान पारंपारिक पदार्थ, मिठाई, तळलेले पदार्थ आणि अगदी मद्यपानाचाही आनंद घेतात. जरी हे पदार्थ आकर्षक आणि स्वादिष्ट असले, तरी ते आपल्या हृदयावर परिणाम करू शकतात, विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयरोग यासारख्या आजार आहेत त्यांच्यासाठी हे पदार्थ घातक ठरु शकतात. अति खाणे, चुकीच्या आहाराची निवड करणे, ताणतणाव आणि अनियमित दिनचर्यांमुळे अनेकांना उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची उच्च पातळी, कोलेस्ट्रॅाल आणि ट्रायग्लिसराइड पातळी वाढणे यासारखे त्रास होतात.
खराब गट हेल्थमुळे येऊ शकतो Heart Attack, ‘या’ लक्षणांनी ओळखा बिघडलेल्या पचनचा धोका
हृदयावर कसा परिणाम होतो?
सणवाराच्या दिवसांमध्ये कॅलरीजयुक्त पदार्थ, गोड, तळलेल्या आणि खारट पदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते. साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थ कोलेस्ट्रॅालची पातळी, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. सणासुदीच्या काळात होणाऱ्या पार्टीजमुळे मद्यपान आणि रात्री उशिरापर्यंतचे जागरण हृदयावर अधिक दाब निर्माण करतात.
हृदयरोगींच्या आहारात आणि जीवनशैलीत अचानक बदल झाल्यास छातीत दुखणे, धडधडणे, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका अशा समस्या उद्भवू शकतात. शिवाय, अपुरी झोप, कार्यक्रमांचे नियोजन किंवा तयारीचा मानसिक ताण आणि सुट्टीच्या काळात वेळेवर औषधं न घेणे किंवा वगळणे हे देखील यास कारणीभूत ठरतात आणि हृदयाच्या समस्या निर्माण करतात.
हृदयाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
गोड, तळलेले, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन कमी करा. एकाच वेळी भरपेट न खाता थोड्या थोड्या अंतराने हलका आहार घ्या. पुरेसे पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. आहारात ताजी फळे, भाज्या आणि सॅलड यांचा समावेश करा. दररोज किमान ४५ मिनिटे न चुकता व्यायाम करा.
हलका व्यायाम, मॉर्निंग वॉक किंवा साधे स्ट्रेचिंग केल्याने वजन नियंत्रणात राखण्यास मदत होऊ शकते. मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाब असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घ्या. छातीत दुखणे, अस्वस्थ वाटणे किंवा चक्कर येणे यासारखी लक्षणं आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या.