गणपती बघायला जाताना गर्दीत लहान मुलांची, वयस्कर लोकांची 'अशा' पद्धतीने घ्या काळजी
गणपती बाप्पाचा आगमन सोहळा मोठ्या आनंद आणि जलौषात पार पडला आहे. बाप्पाच्या येण्यामुळे सगळीकडे भक्तीमय वातावरण झाले आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये सगळीकडे आरत्यांचे स्वर ऐकू येतात. बाप्पाच्या आगमनासाठी केलेले खास डेकोरेशन पाहण्यासाठी आणि बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी घरात अनेक पाहुणे मंडळी येतात. याशिवाय मुंबईमध्ये प्रसिद्ध मंडळांमधील बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, गणेश गल्ली, तेजुकाया इत्यादी मुंबईतील अतिशय फेमस मंडळ आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी स्थापना झालेल्या गणेश मंडळांना मुंबईमध्ये विशेष महत्व आहे.(फोटो सौजन्य – istock)
मुंबईतील नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागच्या गणपती बाप्पाची ओळख आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी लालबागमध्ये दाखल होतात. बाप्पावरील श्रद्धा आणि भक्तीपोटी बाप्पाच्या आगमनाच्या आधल्या दिवसापासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी असते. गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याचदा लहान मुलांचा हात सुटून जातो किंवा लहान मुलांसह वयस्कर वृद्ध गर्दीमध्ये हरवून जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गर्दीमध्ये गेल्यानंतर लहान मुलांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबद्दल काही महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहोत.
गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन कुठेही फिरायला गेल्यानंतर त्यांच्या कपड्यांना लेबल लावावे. ज्यामुळे गर्दीमध्ये मुलांचा हात सुटल्यानंतर किंवा कुठेही चुकामुक झाल्यानंतर तुम्ही मुलांना सहज शोधू शकता. याशिवाय मुलांच्या खिशात मोबाईल नंबर असलेले कार्ड किंवा बिझनेस कार्ड तुम्ही ठेवू शकता. यामुळे हरवलेली मुलं लगेच सापडतील.
लहान मुलांना कुठेही गर्दीच्या ठिकाणी फिरायला घेऊन गेल्यानंतर त्यांच्या कपड्यांचा रंग लक्षात ठेवावा. यामुळे हरवलेली मुलं शोधण्यास मोठी मदत होईल. कुठेही बाहेर जाताना सहज ओळखता येतील अशाच रंगाचे कपडे मुलांना घालावेत. यामुळे घाईगबडीमध्ये मुलांना शोधणे सहज सोपे होईल.
बाहेर पडताना मनःशांती मिळवण्यासाठी तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता ती म्हणजे तुमच्या मुलांचे काही फोटो तुमच्या मोबाईल फोनवर काढा. यामुळे बेपत्ता मुलं सहज शोधात येतील. गणपती मंडळात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना, सुरक्षा रक्षक आणि पोलिस अधिकाऱ्यांना तुम्ही सहजपणे फोटो दाखवू शकता आणि वर्णन करू शकता.
गर्दीमध्ये बऱ्याचदा आई, वडील किंवा लहान मुलांना एकमेकांपासून वेगळे होतात. अशावेळी हरवलेल्या ठिकाणी एका जागेवर शांत उभे राहणे आवश्यक आहे. यामुळे गोंधळ होत नाही. त्यामुळे मुलांना घेऊन गर्दीच्या ठिकाणी फिरण्यापेक्षा त्यांना आरामदायी वाटेल अशा ठिकाणी फिरण्यास घेऊन जावे.